नोंदणी नसणार्यांवर होणार कारवाई : धर्मादाय आयुक्तालयाचा इशारा
पुणे : गणेशोत्सव मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी नसणार्या मंडळावर कारवाई होऊ शकते. ती टाळण्यासाठी गणेश मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्तालयाने केले आहे. हे काम एका दिवसात होण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केल्याचे आयुक्तालयाने सांगितले आहे. दरम्यान, अनधिकृत पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरात हजारो सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. पण, त्यातील अनेकांनी नोंदणी केलेली नाही. अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे फक्त गणेशोत्सव दरम्यानच्या काळातच फक्त अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे अनेक वेळा नोंदणी न करताच उत्सव साजरा केला जातो. पण त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे वर्गणी मागता येत नाही. अशा प्रकारे कोणी तक्रार केल्यास त्याबाबत मंडळावर कारवाई होऊ शकते.
तात्पुरत्या नोंदणीची व्यवस्था
या कारवाईपासून मंडळाचे संरक्षण करण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाने तात्पुरता नोंदणी क्रमांक देण्याची व्यवस्था केली आहे. हे रजिस्ट्रेशन जास्तीत-जास्त सहा महिने वैध असते. या नोंदणीसाठी दोन अधिकारी व तीन कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कमीत-कमी कागदपत्रे आणि प्रक्रिया सुलभ असल्याने मंडळांना अडचण येणार नाही, असे आयुक्तालयाने म्हटले आहे.
तात्पुरत्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
सार्वजनिक ठिकाणी असले तर ग्रामंपचायत किंवा पालिकेचे पत्र.
शहराच्या हद्दीसाठी नगरसेवकाचे विनंती पत्र.
मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचे ओळखपत्र आणि फोटो.
नोंदणी करण्याचे आवाहन
जी गणेश मंडळे अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत, त्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. पण, सोसायट्यांमधील मंडळे नव्याने स्थापन झाली आहेत. त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नसते. त्यामुळे त्यांनी तात्पुरते का होईना, हे रजिस्ट्रेशन करून घ्यावे, म्हणून ही सोय केली आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनची सुद्धा सोय करण्यात आली असून त्याचबरोबर प्रत्यक्षात कार्यालयात येऊन सुद्धा अर्ज दाखल करू शकतात. त्यात किचकटपणा नाही, असे धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी सांगितले.