भुसावळ। गणेशोत्सव मिरवणुकीत यंदा जामा मशिदीसह रजा टॉवर भागात ड्रोन कॅमेर्याची नजर राहणार असून उपद्रवींवर हद्दपारीसह उत्सव काळात शहरबंदीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. नगरपालिका कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. याप्रसंगी नीलोत्पल बोलत होते. ते म्हणाले की, मिरवणूकप्रसंगी कुणाला खांद्यावर घेऊन कुणी प्रार्थनास्थळाजवळ भगवा ध्वज फिरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर निश्चित दुसर्या दिवशी कारवाई केली जाईल. ही बाब अत्यंत अशोभनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर वाजल्यास गुन्हा होणार दाखल
रात्री दहा वाजेनंतरही काही मंडळे लाऊड स्पीकर व डीजे सुरू ठेवतात व पोलीस गाडी येतात बंद करतात मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. पुन्हा लाऊड स्पीकर सुरू करून नॉईस मीटरद्वारे आवाजाची तीव्रता मोजून गुन्हे दाखल केले जातील. सोशल मिडीयावर काही आक्षेपार्ह संदेश आल्यास कायदा हातात न घेता आपल्याला माहिती कळवा , दोषींवर निश्चित कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. गणेश मंडळांनी उत्सव काळात सर्व विभागाची परवानगी घ्यावी तसेच विजेची तात्पुरता जोडणी करून घ्यावी, असेही ते म्हणाले.
व्यासपीठावर या अधिकार्यांची उपस्थिती
व्यासपीठावर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मारोती मुळूक, सहा.निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक विजय नरवाडे, उपनिरीक्षक मनोज ठाकरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी उत्सवासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी गरजेची असल्याचे सांगत सीसीटीव्ही गरजेचे असल्याचे सांगितले.
गणेशोत्सव बैठकीला यांची उपस्थिती
याप्रसंगी रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगरसेवक किरण कोलते, माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, राजेंद्र आवटे, विवेक नरवाडे, साबीर मेंबर आदींची उपस्थिती होती. बैठकीला बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांसह नगरसेवक प्रा.दिनेश राठी, राजू खरारे, लक्ष्मण सोयंके, राजू डोंगरदिवे, संदीप देवडा आदींची उपस्थिती होती.