गणेशोत्सव संपला पण… मांडव अजूनही रस्त्यावरच!

0

पुणे । गणेश विसर्जन मिरवणूक सलग अठ्ठावीस तासानंतर गुरुवारी दुपारी संपली. मात्र आता मिरवणूक संपल्यानंतर मंडप, देखावे, सजावटीचे साहित्य आणि ट्रॅक्टरवर केलेली सजावट तातडीने काढण्याची आवश्यकता असताना पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील शेकडो मंडळांनी ही कामे करण्याची तसदी अद्यापही घेतलेली नाही. परिणामी त्याचा त्रास स्थानिक रहिवासी पादचारी आणि वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे ‘हौस कुणाची सजा कुणाला’ अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मंडप अर्धवट काढलेले
परंतु अद्याप पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील अनेक मंडळांनी मंडप काढण्याचे काम सुरू केलेले नाही किंवा ते संथगतीने सुरू आहे. शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेले मंडप अर्धवट काढलेले आहेत. अनेक ठिकाणी मंडपांचे पत्रे, बांबू, वासे रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर सजावटीच्या सामानाने रस्ता व्यापून गेला आहे.

मंडळांना मंडप किंवा सजावट काढण्यासाठी काही निश्चित नियमावली करून देण्यात आलेली असली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे मंडळांना कोण जाब विचारणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता येथील मंडळे विसर्जनाच्या आदल्या दिवशी मंडप उतरवतात. मात्र, विसर्जन मार्गाच्या जवळ गल्ली बोळांमध्ये वा छोट्या रस्त्यांवर असलेल्या गणेश मंडळांनी मंडप किंवा सजावटीचे साहित्य काढण्याची तसदी घेतलेली नाही. उत्सव संपताच तातडीने मांडव काढण्याचे काम करणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही मांडव रस्त्यावरच उभे असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.