कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने गणेश उत्सवादरम्यान कल्याण येथील 26 तर डोंबिवली येथील 36 विसर्जन घांटावर महापालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जनरेटर व्यवस्था, मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, लाईटींग टॉवर, लाईफ गार्ड, वाहतूक व्यवस्थेकरीता बॅरीगेंटींग उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले असताना आयुक्तांच्या दालनात गणपती उत्सव, फेरीवाला कार्यवाही, वाहतूक नियोजनासंदर्भात पोलिस प्रशासनातील अधिकार्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, वाहतूक पोलिस उपायुक्त अमित काळे, रेल्वे पोलिस, आरटीओचे अधिकारी उपस्थित होते.
जॅमर लावण्याची मागणी
प्रशासनाच्या बैठकीत वाहतूक विभागामार्फत वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. सार्वजनिक मंडळांना विर्सजन मार्ग निश्चित करुन देण्यांचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी वाहतूक पोलिसांनी आयुक्तांना सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करुन देण्याबाबत विनंती केली. तसेच अनधिकृतपणे पार्किंग करणार्याविरुध्द कार्यवाहीसाठी बॅरीगेंटीगऐवजी जॅमर उपलब्ध देण्याची मागणी केली.
अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी रिक्षाचालकांना स्मार्ट कार्ड देणे, रिक्षांमध्ये व्हीटीएस प्रणाली लागू करण्याबाबत पोलिस उपायुक्तांना सांगितले. या बैठकीत प्रोटेस्ट अगेन्स्ट रिक्षावाले यांच्या प्रतिनिधींनी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्यासमवेत उपस्थित अधिकार्यांची भेट घेतली. डोंबिवलीमधील रिक्षा चालकांसंदर्भात मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारणे, 4 थी सिट घेवून नये, रस्त्याच्या दुर्तर्फी रिक्षा उभी करत वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या रिक्षांवर कारवाई करावी, अनधिकृत रिक्षा थांब्यावर कार्यवाही करणे, प्रवाशांसाठी परिवहन सेवा उपलब्ध करुन देणे अशा सूचना केल्या.