जळगाव- शहरातील गणेश कॉलनी परिसरातील युनीटी चेंबर्समधील साई पानसेंटर चोरट्यांनी फोडून सिगारेट तसेच दोन ते तीन हजारांची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. दरम्यान याचठिकाणी दोन दुकानांमध्ये चोरट्यांनी शटर वाकवून चोरीचा प्रयत्न केला, मात्र शटर न वाकल्याने तसेच लॉक न तुटल्याने प्रयत्न अयशस्वी ठरला.
युनीटी चेंबरमध्ये मनिष राजेंद्र वाणी रा. रथचौक यांचे साईपान शॉप आहे. यांच्या शेजारी वर्धमान स्नॅक्स व हेरंभ इंटरप्रायजेस अशी दुकाने आहेत. सोमवारी सकाळी 7 वाजता मनिष वाणी यांना त्यांच्या मित्रांचा फोन आला, त्याने पानसेंटरचे शटर अर्धे उघडे असून चोरीचा प्रकार झाल्याचे सांगितले. त्यानुसार वाणी पोहचले त्यांनी तपासणी केली असता, टॅबीच्या सहाय्याने शटर वाकवून चोरट्यांनी ड्राव्हरमधील दोन ते तीन हजारांची रोकड, तर सात हजारांच्या सिगारेटचा माल लांबविला असल्याचे लक्षात आले. पानसेंटरच्या शेजारी वर्धमान स्नॅक्स, व हेरंभ इंटरप्रायजेस या दोन्ही दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. शटर वाकविण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला. या घटनेने या ठिकाणच्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.