गणेश तलावातील गाळ काढण्याची मागणी

0

निगडी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, प्राधिकरणातील २६ सेक्टरातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला असून शेवाळेही आले आहे. तलावातील गाळ त्वरित काढण्याची मागणी, उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे.

गाळ काण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच संबंधित अधिका-यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. परंतु, संबंधित अधिका-यांनी या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आयुक्तांनी स्वत: याकडे लक्ष देवून संबंधित अधिका-यांना तलावातील गाळ आणि शेवाळे काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत. तसेच तलावाची दर तीन महिन्यातून स्वच्छता करण्यात यावी. गणेश तलावाच्या परिसरात दाट झाडी आहे. त्यामुळे या परिसरात रोज सकाळी नागरिक तेथे फिरायला येतात. निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे येथे कधी न दिसणारे पक्षीही दिसू लागले आहेत. हे नवीन पक्षी पाहण्यासाठी नागरिक तेथे गर्दी करत आहेत. त्यामुळे तलावात बोटींगची व्यवस्था केल्यास नागरिकांना बोटींगचा आनंद घेता येईल. त्यामुळे बोटींग सुरु करण्याचे प्रयत्न करावेत, अशीही मागणी उपमहापौर मोरे यांनी निवेदनातून केली आहे.