गणेश दर्शनासाठी लालबाग, परळमध्ये भाविकांची अलोट गर्दी

0

मुंबई । लाडक्या गणरायाच्या उत्सवाचा उत्साह नागरिकांमध्ये टिपेला पोहोचला आहे. यामुळे मुंबई शहरातील रस्ते गणेश दर्शनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. रविवारी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. तसेच उद्या अनंत चतुदर्शी असल्यामुळे सोमवारीही भाविकांची अशीच तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत शहर जागे होते. पावसाने उसंत घेतल्यामुळे भाविक गणेश दर्शनाचा आनंद मनसोक्तपणे लुटत होते. रविवारी मात्र गर्दीने उच्चांक गाठला होता, तसाच सोमवारीही गर्दीने उच्चांक गाठला होता. नागरिक गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.

गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवस मुंबईला जत्रेचे स्वरूप
गिरगाव, खेतवाडी, कुंभारवाडा ते चिंचपोकळी, मुंबई सेंट्रल, परळ, दादर या सर्व परिसरातील गणपती पहाण्यासाठी गणेशभक्तांनी अक्षरशः गर्दी केली होती. देखण्या मूर्ती व आकर्षक देखावे नागरिकांच्या आकर्षणाची बाब ठरत होते. गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून सुबक मूर्ती व आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. गणेश दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळी बाहेर पडू लागले, यामुळे चहा व नाश्त्याच्या टपर्‍याही रात्रभर सुरू ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांची काही प्रमाणात सोय झाली. शहराबरोबर उपनगरातील गणेशोत्सव मंडळे गर्दी खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. अनेक मंडळांनी भव्य देखावे सादर करण्याची परंपरा जपली आहे. विशेषत: वांद्रे, अंधेरी, बोरिवलीपासून ते कुर्ला, चेंबूर, सायन आदी भागांत नागरिकांची गर्दी वाढत आहे. पहाटेपर्यंत नागरिक दर्शन घेत होते. रविवारी यामध्ये कमालीची वाढ झाली. नागरिक मोठ्या संख्येने दर्शनाला बाहेर पडले. मंगळवारी गणेश विसर्जन असून, त्यामुळे रविवारी रात्री जागरण करण्यास पसंती दिल्याचे दिसून येत होते.

रात्री उशिरापर्यंत बससेवा
महिला, मुले, वयस्कदेखील दर्शनासाठी बाहेर पडत होते. रात्रीच्या वेळी पोलिसांकडून चारचाकी वाहनांना शहरात परवानगी नाकारण्यात येत असल्यामुळे नागरिकांना पायपीट करून दर्शनाचा लाभ घ्यावा लागत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने रात्री उशिरा बससेवा सुरू ठेवली. बसेस शहरातील उपनगरांतून धावत असून, याचा लाभ नागरिकांना होत आहे. गणेश दर्शनासाठी युवकांची अधिक संख्येने गर्दी होत होती. टोळक्या टोळक्याने युवक दर्शनाचा लाभ घेत होते. गणरायाचा जयजयकार करत जोरदार घोषणाबाजी करत असताना दिसत होते.