जुन्नर । गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळानी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजोपयोगी कार्य करावे, असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. जुन्नर येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राव बोलत होते. ते म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सवास 125 वर्षे पूर्ण होत आहेत. गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान अंगिकारत वृक्षलागवड, नदी पुनर्जीवन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शिक्षणाचा प्रचार व प्रसार आदी समाज हिताचे उपक्रम राबवावे.
शांतता भंग करणार्यांवर कारवाई
डॉल्बी मुक्त, दारूमुक्त गुलालमुक्त गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन यावेळी राव यांनी केले. कायदा व सुव्यवस्था यामध्ये बाधा निर्माण करणार्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला जाणारा असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी यावेळी दिला. यावेळी आमदार शरद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आदर्श गणेश मंडळ पारितोषिक रविवार पेठ परदेशपुरा मंडळ, शंकरपूरा गणेशोत्सव मंडळास अनुकर्मे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, नगराध्यक्ष शाम पांडे, श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, गटनेते दिलीप गांजाळे, प्रांताधिकारी अजित देशमुख, तहसीलदार किरण काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.