गणेश मंडळांनी सीसीटीव्हीवर खर्च करावा

0

दौंड । गणेशोत्सवात डीजेवरील अनावश्यक खर्च टाळून गावात सीसीटीव्हीसारख्या आवश्यक गोष्टींसाठी खर्च करावा, असे आवाहन बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांनी केले. दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दौंडच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, उपअधीक्षक गणेश मोरे, दौंडचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाहकर, यवतचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात याप्रसंगी उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रमांसह गावात आणि शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होते. सण व उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यसाठीही याची मदत होणार आहे. वर्गणीचा सदुपयोग करण्यसाह तो सामाजिक कार्यासाठी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पखाले यांनी यावेळी केल्या. या बैठकीस गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह दौंड नगरपालिकेचे सदस्य, तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.