साक्री । येथील अरिहंत नगर व साईरामनगरच्या साई गणेश मंडळतर्फे मंडळातील प्रत्येक सदस्यांना सपत्नीक रोप वितरीत करण्यात येवून पुढील वर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. मंडळाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. साक्रीच्या साई गणेश मंडळातील गणेशाचे सातव्या दिवशी कोणत्याही प्रकारची वाजंत्री न लावता शांततेत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी दिघावे येथील राजे छत्रपती प्रतिष्ठानतर्फे गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांना झाडे लावून ते जगविण्याचे आवाहन करण्यात येवून प्रत्येक जोडप्यांना रोप भेट देण्यात आले.
प्रश्नमंजूषा स्पर्धा
यावेळी छत्रपती प्रतिष्ठानचे संचालक मोठाभाऊ देसले, पेस्टीसाईल कंपनीचे सेल्स ऑफीसर प्रशांत पवार, नरेंद्र पगारे, गौरव पाटील, पंकज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात महिला वर्गाने उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून प्रत्येकाच्या दारी झाड लावून त्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. या सात दिवसाच्या गणेशोतसव काळात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.पी.झेड.कुवर यांचे ‘लेक लाडली या घरची’ या विषयावर व्याख्यान झाले. 8 वी चा विद्यार्थी सार्थक नांद्रे याने ‘बाल शहिदाचे बोल’ तर श्रृती जाधव हिने ‘माझी मुक्ताई’ वर उत्तम सादरीकरण केले. गणेश मंडळ स्थापन करण्याचा ऐकवे उद्देश होता की या माध्यमातून सामाजिक प्रबोधन एकता, एकात्मता पर्यावरण रक्षण या सारखे उपक्रम घेणे, यशस्वीतेसाठी मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.