लेखक आणि वाचक याची अदृष्य भेट वाचनालयात होते : डॉ. रामचंद्र देखणे
तळेगाव : प्रत्येक वाचक हा आस्वादकच नाही तर समीक्षक असतो. लेखक आणि वाचक याची अदृष्य भेट वाचनालयात होते. यामुळे जीवनाचा आनंद मिळतो. ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर असते, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर होते. व्यासपीठावर तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष सुरेशभाई शहा, गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष अशोक संभूस, चिटणीस वसंतराव डंबे, खजिनदार दिनेश कुलकर्णी, ग्रंथपाल विनया अत्रे आदी उपस्थित होते.
ग्रंथालय सर्वस्पर्शी असावे
डॉ. रामचंद्र देखणे पुढे म्हणाले की, तळेगाव दाभाडे हे सांस्कृतिक आणि प्रज्ञावंतांचे गाव आहे. पुरुषार्थ आणि परमार्थ हातात हात घालून चालणारे गाव आहे. ग्रंथालय म्हणजे शारदेचे लावण्यरुप आहे. मुक्त सरस्वतीचे दर्शन गणेश मोफत वाचनालयात होते. ग्रंथालय सर्वस्पर्शी असावे. पसायदानात ज्ञानेश्वरांनी ग्रंथांचा विचार मांडला आहे. ग्रंथोपजीवी म्हणजे ज्ञानावर उपजिविका करणार्यांचे कल्याण होवो असं ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलं आहे. संस्कारीत ग्रंथांची परंपरा जुनी आहे. ग्रंथालयांना 2 हजार 700 वर्षांचा इतिहास आहे. भारतात नालंदा विद्यापीठात ग्रंथालये होती. महाराष्ट्रात पाटण्याजवळ ग्रंथालयाचा संदर्भ आढळतो. वाचता येतं तो वाचत नाही पण ज्यांना वाचता येत नाही ते चांगले वाचतात, शहाणी होतात. ग्रंथ ही संपदा आहे. ज्याच्याकडे ग्रंथ तो खरा श्रीमंत. पूर्वी ग्रंथांची पालखी निघायची. त्यामुळे ग्रंथांना फार मोठी प्रतिष्ठा होती.
ग्रंथालय काळाची गरज
दत्तात्रेय क्षीरसागर म्हणाले की, हरीभाऊ देशपांडे यांना देवदूत म्हणावे लागेल. समाजासाठी, भावी पिढ्यांसाठी ग्रंथालय सुरू केले, हे त्यांचे मोठे ऋण आहे. गावागावात ग्रंथालय असणे आणि त्यांचा वापर होणे, ही काळाची गरज आहे. परीक्षेपुरते वाचले जाते. मुलांना जास्तीत जास्त वाचायची सवय लावली पाहिजे. बौद्धिक विकासासाठी प्रत्यक्ष पुस्तके वाचणे महत्वाचे आहे. मुलांना सुंदर ग्रंथसंपदेची ओळख करून द्यावी. पुस्तके ही सर्वात जवळची मित्र आहेत. जीवनात परिवर्तन करण्याची क्षमता पुस्तकांमध्ये असते. वाचकांचे प्रतिनिधी म्हणून प्रा. जयंत जोर्वेकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गणेश वाचनालय हे संपन्न संदर्भ ग्रंथालय आहे. यामुळे कोणत्याही संदर्भासाठी तळेगाव मधील वाचक व अभ्यासकांना बाहेरगावी जावे लागत नाही. विविधतेमुळे हे ग्रंथालय समृद्ध आहे. संस्थापक हरीभाऊ देशपांडे यांच्या प्रतिमेचे व सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन तसेच दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत अशोक संभूस यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत दिवेकर यांनी केले. सूत्रसंचालक माधुरी ढमाले कुलकर्णी यांनी केले. वसंतराव डंबे यांनी आभार मानले.