भुवनेश्वर । गतविजेत्या टिंटू लुकाने सुरवातीच्या खराब कामगिरीनंतरही 22 व्या आशियाई मैदानी स्पर्धेतील महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत धडक मारली. लुकाच्या जोडीने लिली दास आणि अर्चना आढावनेही या शर्यतीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. याशिवाय अंकित शर्मा (7:42 मीटर) , एस शम्शीर (7:42 मीटर) आणि सिद्धार्थ मोहन नाईकने (7:39 मीटर) पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लांब उडीत या तिघांकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे.
लुकाने दुसर्या प्राथमिक फेरीत 2:6:66 मिनीटे अशी वेगवान वेळ नोंदवत अंतिम फेरीतले स्थान पक्के केले. तिच्या सहकारी लिली दास (2:07:24 मिनीटे) आणि अर्चना आढावने (2:09:42 मिनीटे) अशा कमागिरीसह अंतिम फेरी गाठली.
पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत जिंसन जॉनसनने पहिल्याच फेरीत 1:50:48 मिनीटे अशा कामगिरीसह अंतिम फेरीत प्रवेश केला. या शर्यतीत जिंसन सुवर्णपदकाचा मोठा दावेदार आहे.
विश्वंभर कोळेकरने तिसरी फेरी जिंकत अंतिम फेरी गाठली. याशिवाय भारतीय वंशाच्या अमेरिकेत स्थाईक झालेल्या सिद्धांत दुसर्या फेरीत 13:72 सेकंद अशी वेळ नोंदवत पुरुषांच्या 110 मीटर हर्डल्स शर्यतीची अंतिम फेरी गाठली.