गतिरोधक व सुचक फलक लावण्याची मागणी

0

चाळीसगाव। तालुक्यातील ओझर येथे हनुमान मंदीराजवळ, वडार समाज वस्तीसमोर, राजाराम गुजर यांचे घरासमोर, मंडाई पेट्रोल पंपासमोर गतिरोधक टाकावे तसेच जि.प शाळेसमोर सुचक फलके लावावीत अशी मागणी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता चाळीसगाव यांच्याकडे बाजीराव गुजर व ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास 14 ऑगस्ट रोजी ओझर येथे रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भडगावरोडवर ओझर गाव असुन या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालतात त्यामुळे गावकर्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता ओलांडतांना कसरत करावी लागते. हनुमान मंदीर, वडार वस्ती व इंदीरा नगर मधील ग्रामस्थांना अधिक कसरत करावी लागत आहे. दोन दिवसापुर्वी मोटारसायकल वरील दांपत्याला वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाल्यांची घटना घडली होती. अशा घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे. तसेच गावातील 400 ते 450 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतात त्यांना देखील रस्ता ओलांडुनच शाळेत जावे लागते. आजपावेतो 10 ते 12 विद्यार्थ्यांचा किरकोळ अपघात देखील झाला आहे. निवेदनावर अखिल भारतीय गुजर महासभेचे बाजीराव गुजर व ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत.