गतीरोधकांची उंची कमी करण्यात यावी-अमोल राजेंद्र घोडके

0

पिंपरी-पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वत्र रस्त्यांवर गतीरोधकांची दुरवस्था झाली आहे. हे गतीरोधक इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. गतीरोधक नियमानुसार नसल्याने रस्ते अपघाती झाले आहेत.

प्रशासनाने शासकीय मानकानुसार गतीरोधक बनविणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील कित्येक गतीरोधक परवानगी न घेता टाकले जात असल्याने त्या ठिकाणी सतत लहान-मोठे अपघात होतात. तसेच, नियमानुसार गतीरोधक नसल्याने अनेक वाहनांचा खालचा भाग घासत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आयआरसी नियमानुसार मुख्य रस्त्याला गतीरोधक टाकता येत नसून अंतर्गत रस्त्यावर बनविण्यास परवानगी आहे. मात्र, प्रशासन नियमानुसार गतीरोधक तयार करत नसल्याने कित्येक वाहन चालकांचे अपघात होऊन बळी गेलेले आहेत. शहरातील मुख्य मार्गावरील मोठमोठ्या चौकात सिग्नलच्या मध्यभागी गतीरोधक असून या ठिकाणी असलेले झेंब्रा क्रॉसिंग’चे पांढरे पट्टे पुसट झालेले आहेत. यामुळे, वाहन चालकांना वाहने उभी करण्याचा अंदाज येत नसल्याने कित्येकजण चौकाच्या मध्यभागी वाहने उभी करतात. याचा परिणाम म्हणजे वाहतूक पोलीस नियम मोडल्याबद्दल दंड वसूल करतात.