रोटरी क्लब ऑफ चिंचवड शिशिर व्याख्यानमालेत ‘गदिमायान’चे आयोजन
गदिमांची जन्मशताब्दीनिमित्त रसिकांना मेजवानी
पिंपरी : ‘दूर राहिल्या सखी, बोलण्या कुणासवे, सूर दाटले मुखी’ अशा रचनांनी ‘गदिमायान’ने पिंपरी-चिंचवडच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध कवी ग.दि.माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्यावतीने शिशिर व्याख्यानमालेत हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे, 1973 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या 49 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान गदिमांनीच भूषवले होते. योगायोगाने नुकतेच यवतमाळ येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात झालेल्या ‘गदिमायान’ कार्यक्रमानंतर सर्वात प्रथम पिंपरी-चिंचवडमध्ये हा कार्यक्रम पार पडला. गदिमांची जन्मशताब्दी हा योगायोग साधून माडगूळकरांच्या रचनांची वेगळ्या ढंगात रसिकांना मेजवानी देण्यात आली.
हे देखील वाचा
दिशदर्शिकेचे केले प्रकाशन
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रोटरी क्लब ऑफ चिंचवड-पुणे यांच्यावतीने ‘शिशिर व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आले आहे. दुसर्या दिवशी गदिमायान स्मृतिगंध कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, बाळकृष्ण खंडागळे, प्रांतपाल 3131चे डॉ. शैलेश पालेकर, मनोहर दीक्षित, संजय खानोलकर, संजीव दात्ये आदी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवड व पिंपरी-चिंचवड डॉक्टर असोसिएशनच्यावतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे अवयवदानाबाबत असलेली सर्व माहिती त्यात प्रसिध्द करण्यात आली आहे. डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.सुहास जाधव, डॉ.प्रशांत जीवतोडे, डॉ.राजेंद्र चावट आदी उपस्थित होते. तसेच शिशिर व्याख्यानमालेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी केले.
गदिमांच्या कवितांचे सादरीकरण
‘गदिमायान’ कार्यक्रमात गदिमांच्या कविता, लेख यांचे सादरीकरण करण्यात आले. तर माडगूळकरांनी लिहिलेली गीते आणि त्याला सुधीर फडकेंनी दिलेले स्वर यांचा मेळ साधण्यात आला. त्याचवेळी पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तही काही रचना सादर करण्यात आल्या. गीतरामायणाने या कार्यक्रमाला खरा बहर आला. ‘अद्वैत’ ही गदिमांची कविता रसिकांना अंतर्मुख करून गेली. ‘खिडकीतून मी डोकावले.. हसर्या स्वराने तो एक श्लोक गात होता. दोन्हीतले एक सत्य असले पाहिजे. ‘मी दास नाही किंवा माझी उपेक्षा झाली नाही. मग शय्येशी खेळले ते कोण? शरीर. दु:ख भोगत होता तो कोण? देह. मग मी कोण? समोर खिडकी नाही वेड्या तो आरसा आहे. मी दास नाही मी रामच आहे’ ही रचना ऐकताना गदिमांच्या शब्दातले संतत्व भारावून टाकणारे होते. यावेळी अपर्णा केळकर यांनी गायन केले. तर काव्यवाचन अक्षय वाटवे आणि गौरी देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी होत्या.