पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 2 व 3 जून रोजी होणार कार्यक्रम
पिंपरी : महाराष्ट्राचा काही भाग अजुनही दुर्गम व दुष्काळग्रस्त आहे. या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 4 ते 5 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. तरीही फक्त शिक्षणाची आस असल्यामुळे हे विद्यार्थी विनातक्रार असेच शिक्षण घेत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी व टिम एकलव्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी सायकलदान महाअभियान राबविण्यात येत आहे. अभियानाअंतर्गत सायकल संकलन शिबिराचा दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दि. 02 व 03 जून रोजी होणार आहे. शहरातील प्रमुख 9 सायकल संकलन केंद्रांवर हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे मुख्य संयोजक सत्तार शेख व समाधान पाटील यांनी सांगितले.
अकोलेमध्ये सायकल वाटप
राज्यातील अनेक भागात आदिवासी, भटके व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत. या धडपडीला अधिक बळ देण्यासाठी प्रयोगवन परिवार, ह्युमन्स सोसायटी व टिम एकलव्य कार्यरत आहे. या तीन संस्थांनी एकत्र येत अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘सायकलदान महाअभियान’ या मोहिमेची आखणी केली. त्यानुसार जानेवारी महिन्यापासुन सोशल मिडीयाच्या माध्यमांतून या मोहिमेला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठीचे कॅम्पेन चालवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोले (जि. अहमदनगर) या आदिवासी तालुक्यात 15 विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यात 5 सायकलींचे वाटप करण्यात आले.
मुंबईतूनही अभियानाला सुरूवात
सायकलदान महाअभियान या मोहिमेअंतर्गत सायकल संकलनाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ मुंबई येथून दि. 26 मे रोजी झाला. पहिल्या टप्प्यात मुंबई मधील चार सायकल संकलन केंद्रातून 55 जुन्या व नव्या सायकलींचे संकलन करण्यात यश आले. दुसरा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील 09 सायकल संकलन केंद्राद्वारे पार पडणार आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस चालणार्या सायकल संकलन शिबीरात सुस्थितीतील वापरण्यायोग्य (दुरूस्त केलेली) सायकली किंवा नवीन सायकली स्विकारल्या जाणार आहेत. याशिवाय ज्या दात्यांना थेट आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी संयोजक सत्तार शेख (9130138973 / 7875753550) व समाधान पाटील (9028972975) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सायकलदान महाअभियानच्यावतीने करण्यात आले आहे.