गरजेपुरतेच पैसे काढा

0

नवी दिल्ली : बँक किंवा एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रकमा काढल्या गेल्याने लगेचच चलनटंचाईची झळ बसू लागली आहे. अनेक एटीएम व बँकांमध्ये चलनाचा तुटवडा जाणवू लागल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी बँक व एटीएमधून देशभरातील नागरिकांनी केवळ गरजेपुरतेच पैसे काढावे, असे आवाहन बुधवारी केले. काही लोकांनी मोठ्या रकमा काढल्याने अन्य नागरिकांना पैसे मिळण्यात अडचण येत आहे, असेही दास यांनी सांगीतले. लवकरच चलनात 1 हजार रूपयांची नोट दाखल होणार असून तिची छपाई वेगाने सुरू आहे. त्यानंतर चलनतुटवडा कमी होईल, असे दास यांचे मत आहे.

एटीएमबाहेर पुन्हा पाट्या

बँकांमध्ये पुरेसे चलन आल्यानंतर एटीएम व बँक खात्यातून लोकांना पैसे मिळू लागले आहेत. परंतू पैसे काढण्याची मर्यादा टप्प्याटप्प्याने वाढविला जात असताना काही बँका आणि एटीएममध्ये चलनाचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. यामुळे अनेक एटीएम आणि बँकांमध्ये पैसे मिळत नाहीत. काही एटीएमबाहेर पुन्हा पैसे नसल्याच्या पाट्या झळकू लागल्या आहेत. याच तक्रारींची दखल घेऊन केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी जनतेला ट्विटरवरून गरजेपुरतेच पैसे काढून सहाकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येकाने खरोखरच आवश्यकता असेल तेवढेच पैसे एटीएममधून काढावेत, असे दास यांनी म्हटले आहे.

असे उठवले निर्बंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर मोठ्याप्रमाणात चलनटंचाई निर्माण झाली होती. चलनटंचाईमुळे बँक, एटीएममधून काढण्यात येणार्‍या रक्कमेवर रिझर्व्ह बँकेने अनेक निर्बंध घातले होते. मागील काही दिवसांपासून हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला 2000 आणि त्यानंतर 4000 रुपये दिवसाला काढता येतील, असा नियम केला. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यावरील मर्यादेत वाढ करून दिवसाला 10 हजार रुपये काढण्याची सूट दिली होती. यापूर्वी बँक खात्यामधून दिवसाला 24 हजार इतकी रक्कम काढता येत होती. 20 फेब्रुवारीपासून ही मर्यादा 50 हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. 20 फेब्रुवारी ते 13 मार्च या काळात ही मर्यादा कायम राहील. 13 मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. त्यानंतर 13 मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून दिवसाकाठी पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे.