गरज सरो वैद्य मरो!

0

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपने एनडीएमधील आपल्या सहकारी पक्षांना चुना लावला. भाजपला केंद्रात बहुमताएवढे संख्याबळ मिळाल्याने आता एनडीएमधील पक्षांची त्यांना गरज उरलेली नाही. एनडीएमधील तीन राज्यांतील टीम पक्ष महत्त्वाचे आहेत. आंध्रमधील तेलुगु देसम, बिहारमधील जेडीयू, पंजाबातील अकाली दल आणि महाराष्टातील शिवसेना हे पक्ष सर्वांत महत्त्वाचे आहेत. पण भाजपने या चारही पक्षांना फारसा भाव न देता आपल्या पद्धतीने विस्तार करून घेतला. मात्र, या विस्तारानंतर सर्वाधिक आगपाखड शिवसेनेने केली. या विस्तारात शिवसेनेला मंत्रिमंडळात घेण्याचे सोडा शपथविधीला बोलावण्याचे स्वारस्यही भाजपने दाखवले नाही. या विस्तारानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एनडीए मृत झाल्याची घोषणा केली. एनडीए फक्त बैठकीपुरती उरली असल्याचे सांगितले. मात्र, दोन दिवसांनी पुन्हा चिडीचूप. भाजपने यावर साधी प्रतिक्रियाही दिली नाही. यांना अनुल्लेखाने मारण्याचे भाजपने ठरवले आहे. उद्धव ठाकरे कोणतीच भूमिका घेत नसल्याने भाजपचे फावले आहे. त्यामुळे शिवसेनेचा ठायी ठायी अपमान करण्याचे धाडस भाजप करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना युतीमध्ये अनेक वेळा खटके उडत, पण बाळासाहेबांना दुखावण्याची हिंमत भाजपने कधी केली नाही. शिवसेना प्रमुखांवर टीका करण्याची हिंमत कुणी केली नव्हती. आजकाल आशिष शेलार आणि किरीट सोमय्याही ऊठसूट उद्धव ठाकरेंवर टीका करतात.

शिवसेना नेतृत्व यासाठी चिडले की त्यांच्या वाट्याचे मंत्रिपद देण्यास भाजप गेली तीन वर्षे चालढकल करत आहे. फक्त एक मंत्रिपद देऊन भाजपने शिवसेनेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. यापूर्वी शिवसेनेकडे दोन मंत्रिपदे आणि एक राज्य मंत्रिपद असे यावेळी मात्र अजून एक मंत्रिपद देण्यास भाजपकडून टाळाटाळ केली जात आहे. मागे सुरेश प्रभूंचे मंत्रिपद भाजपला शिवसेनेच्या कोट्यात टाकायचे होते. त्यावेळी शिवसेनेने ताठर भूमिका घेतली. मात्र, आता उद्धव ठाकरे हे काहीच भूमिका घेत नसल्याने वारंवार शिवसेनेचा अपमान केला जात आहे. या विस्तारानंतर उद्धव ठाकरे काय तरी भूमिका घेतील अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती. पण संघटनात्मक बाबींवर चर्चा करत ही बैठक उद्धव ठाकरेंनी गुंडाळली. आपला पक्ष वाढवताना त्या राज्यातील काँग्रेसविरोधी पक्षाला सोबत घ्यायचे आणि त्यांची उपयुक्तता संपली की त्या पक्षाला दूर करायचे ही भाजपची जुनी नीती आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करण्याचे ठरवले आहे. पण शिवसेना त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सरकारमध्ये असल्याने शिवसैनिकही संभ्रमात आहेत. काँग्रेस पक्ष हळूहळू राज्यातून रसातळाला जात आहे. आता मुख्य आव्हान शिवसेनेचे आहे हे भाजपला ठाऊक आहे. या पक्षाला सोबत ठेवून संपवायचे हे भाजपचे धोरण आहे. सचिवांना आवरा भाजपशी ठोसपणे सामना करण्यासाठी संघटना मजबूत हवी, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी बैठकही बोलावली. या बैठकीत वेगळ्याच गोष्टी समोर आल्या. संघटनेत सचिवांचे महत्त्व अचानक वाढले आहे. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत पडलेले आणि मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या आगेमागे करणार्‍या विनायक राऊत यांना सचिव करण्यात आले पुढे त्यांना खासदारकीची तिकीट कोकणातून देण्यात आले. ते खासदारही झाले. विदर्भाची जबाबदरी या सचिवांवर होती. तेथे पक्षाची वाताहत झाली. दुसरे सचिव आदेश बांदेकर हे 2009 साली दादरमधून पराभूत झाले. लगेच त्यांना सचिव केले.

नुकतीच पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी यांच्यावर होती. एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. याची बक्षिसी म्हणून यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्षपद देण्यात आले. तिसरे सचिव अनिल देसाई हे शिवसेनेचे पांढरपेशे नेते समजले जातात. सेनाभवनमध्ये आल्यानंतर याच मंडळीना महत्त्व असते मग आम्ही कशाला सेना भवनमध्ये यायचे, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना रामदास कदम आणि कीर्तीकर यांनी केला. संपर्कप्रमुख आणि नेत्यांना किंमतच नाही मग पक्ष कसा वाढणार, असाही प्रश्‍न विचारण्यात आला.

– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124