गरिबांना ७२ हजार देण्यासाठी यांच्याकडून आणू पैसे; राहुल गांधींनी दिले उत्तर

0

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज पुण्यात तरुण मतदारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्यासाठी ‘न्याय योजने’ची घोषणा केली. मात्र त्यासाठी निधी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राहुल यांनी आज भाष्य केले. नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोकसी आणि विजय माल्ल्याकडून पैसे आणून गरिबांना देऊ, असे उत्तर राहुल गांधीनी दिले.

राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना न्याय योजनेचा पुनरुच्चार केला. मात्र या योजनेसाठी पैसा कुठून आणला जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच होता. आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ‘नीरव मोदी, मेहुल चोकसी, अनिल अंबानी आणि विजय माल्ल्यासारख्या लोकांकडून पैसा घेऊन आम्ही तो लोकांना देऊ. त्यासाठी मध्यम वर्गावरील कराचा बोजा वाढवणार नाही,’ असं राहुल म्हणाले. ‘आम्ही या योजनेसाठी आवश्यक तो अभ्यास केलेला आहे. कुठून पैसा आणायचा, तो कोणाला द्यायचा, याचा अभ्यास करण्यात झालेला आहे. आधी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येईल. त्यानंतर देशभरात तिची अंमलबजावणी केली जाईल,’ असं त्यांनी सांगितलं.