भुसावळातील गरीबांचे अतिक्रमण हटवले मात्र श्रीमंतांच्या अतिक्रमणाचे काय ? ; आता बेरोजगारांना रोजगारही द्यावा

भुसावळात प्रहार जनशक्ती पार्टीची पत्रकार परीषदेत मागणी : गरीबांचे अतिक्रमण हटवले मात्र श्रीमंतांचे अतिक्रमण काढणार कधी ?

भुसावळ : शहरातील बेरोजगारांचे अतिक्रमण काढण्यात आल्याने शेकडो बेरोजगारांना रोजगार देण्याची आता जवाबदारी आमदारांसह पालिका प्रशासनाची आहे, गरीबांच्या अतिक्रमणावर जेसीबी चालवण्यात आला मात्र शहरातील अनेक अनधिकृत कॉम्प्लेक्स पाडण्याचे आदेश आहेत, अनेक माजी नगरसेवकांची अतिक्रमणे आहेत त्यावर साधी कारवाईदेखील झाली नसल्याचा आरोप भुसावळातील प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवार, 1 मार्च रोजी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत केला.

बेरोजगारांना आता रोजगारही द्यावा
प्रहार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख म्हणाले की, भुसावळातील एका कार्यक्रमात आमदार संजय सावकारे यांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी केली व त्यानंतरच्या चार दिवसातच शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. ज्यांना लोकांनी निवडून दिले त्यांनीच गरीबांना बेरोजगार केले, असा आरोप शेख यांनी करीत या प्रकाराचा प्रहार पक्ष निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. अतिक्रमण हटवण्यानंतर शहरातील अनेक अपंग बांधवांनी उत्तर महाराष्ट्र प्रभारी अनिल चौधरी यांची भेट घेतली व त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर हा प्रकार टाकल्यानंतरच ही पत्रकार परीषद घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घडल्या प्रकाराविषयी स्थानिक पालिकेवरील प्रशासक व मुख्याधिकार्‍यांना मंत्रालयात बोलावून मंत्री बच्चू कडू जाब विचारतील, असे शेख यांनी सांगितले.

24 तास पूर्ण होण्याआधीच हटवले अतिक्रमण
भुसावळ पालिकेने अतिक्रमण हटवताना नोटीसा बजावल्या मात्र 24 तास होण्याआधीच अतिक्रमण काढण्यास सुरूवात करण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्येक नोटीसीवर टाकण्यात आलेला जावक क्रमांक वेगवेगळा असून त्याचे वर्षही वेगळे आहे. काही व्यावसायीक दरवर्षी पालिकेचा कर भरत होते मात्र त्यांचेही अतिक्रमण हटवून त्यांना बेरोजगार करण्यात आल्याचे फिरोज शेख यांनी स्पष्ट केले. खडका रोडवर नागरीकांना बसण्यासाठी फरशा लावल्या मात्र त्यावर जेसीबी चालवण्यात आला तर दुसरी स्ट्रीट लाईट बंद असताना पालिका बेदखल असल्याचे ते म्हणाले.

भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी कंत्राटदार
भुसावळ पालिकेतील एका अभियंत्यांच्या भाच्याच्या नावावर पाच कंत्राट घेण्यात आले असून हे कंत्राट मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनीच घेतले असल्याचा आरोप फिरोज शेख यांनी केला. याबाबत लवकरच आगामी पत्रपरीषदेत कागदपत्रे सादर करू, असेही त्यांनी सांगितले. जामनेर रोडवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम अनधिकृत आहे, नवशक्ती आर्केडमधील अनधिकृत अतिक्रमण पाडण्याचे आदेश होवूनही त्यावर कारवाई का नाही? असा प्रश्नही शेख यांनी उपस्थित केला. पाच वर्ष पालिकेवर चुकीच्या लोकांनी राज्य केले, आत त्यांनी दुसर्‍या पक्षात प्रवेश केला आहे मात्र तोच कित्ता प्रशासक व मुख्याधिकारी गिरवत असल्याचा आरोप शेख यांनी केला. बुधवार, 2 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत असून त्यानंतरही न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बड्या अतिक्रमणावर कारवाई का नाही ?
प्रहार शहराध्यक्ष प्रकाश कोळी (खन्ना) म्हणाले की, शहरातील अनेक मोठी अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत मात्र त्यावर कारवाई होत नाही मात्र हातावर पोट भरणार्‍यांचे अतिक्रमण हटवण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या भरवशावर पालिका मुख्याधिकार्‍यांनी दबंगगिरी चालवल्याचा आरोप त्यांनी केला. हातावर पोट भरणार्‍यांचे अतिक्रमण हटवण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

धनदांडग्यांना पालिकेने दिले अभय
जामनेर रोडवरील साईजीवन शेजारी असलेल्या सर्वे क्रमांक 145/146, टीपी स्कीम 4 अ व ब मध्ये तीन दुकानांचे अतिक्रमण झाले असताना तेथे पालिकेने कारवाई केली नाही शिवाय जामनेर रोडवर अनेक पक्के अतिक्रमण असताना ते का हलवण्यात आले नाही? असा प्रश्न केदार सानप यांनी उपस्थित केला. दोन वर्षांपासून कोरोना संकट असताना तो कोरोना कमी होताच व्यावसायीकांना रोजगाराची उपलब्धी सुरू होत असतानाच अतिक्रमण हटवून त्यांच्या पोटावर मारण्याचे काम करण्यात आल्याचे सानप म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला प्रहार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, शहराध्यक्ष प्रकाश कोळी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख कलीम, प्रहार कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष केदार सानप, युवक शहराध्यक्ष सनी गोणे, युवक सरचिटणीस चेतन पवार, बबलू खान आदींची उपस्थिती होती.

शहरातील पालिका संकुलातील अतिक्रमण हटवणार
भुसावळातील अतिक्रमण हटवताना नियमानुसारच हटवण्यात आले असून यापुढे शहरातील पालिकेच्या संकुलांमध्ये बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या हॉटेल्स, लॉज तसेच व्यायामशाळा सुरूवातीला तोडण्यात येतील, असे पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले. अतिक्रमण हटवण्यापूर्वी संबंधित व्यावसायीकांना नोटीसा बजावण्यात आल्या शिवाय वाहन फिरवून लावूड स्पीकरद्वारे सूचनाही करण्यात आली शिवाय ज्यांचे पक्के अतिक्रमण आहे व जे मोहिमेत निघाले नाही त्याबाबत पुराव्यासह कागदपत्रे दिल्यास निश्चित पालिका कारवाई करेल, असेही मुख्याधिकारी म्हणाले.

‘त्यांच्याच’ नेत्यांना आपण उत्तर देणार :  आमदार
आपल्यावर ज्यांनी आरोप केले आहेत त्याऐवजी ‘त्या’ पक्षाच्या मुख्य नेत्यांनी आपल्यावर आरोप करावेत मगच आपण उत्तर देवू, असे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.