गरीबांना मिळणार मोफत वीज

0

नवी दिल्ली । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सौभाग्य या अभिनव योजनेची घोषणा केली. यात ‘प्रधानमंत्री सहज बिजली योजने’चे (सौभाग्य) त्यांनी उदघाटन केले. देशातील सुमारे 4 कोटी जनतेला या योजनेच्या अंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार आहे.

सौभाग्याचा संकल्प
सौभाग्य योजनेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही 4 कोटी लोकांच्या घरात अद्यापही वीज उपलब्ध नाही. याचा परिणाम घरातील महिलांवर होत आहे. या योजनेद्वारे सरकार लोकांच्या घरी येऊन वीज कनेक्शन देणार आहे. यासाठी गरिबांना सरकारी कार्यालयांत जाऊन खेटे घालावे लागणार नाहीत. यासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला एकही रुपया द्यावा लागणार नाही. गरीबांच्या या सौभाग्याचा संकल्प आम्ही करणार आहोत.

काय आहे सौभाग्य योजना?
सौभाग्य योजनेचे पूर्ण नाव ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ म्हणजेच सौभाग्य आहे. 31 मार्च 2019 पर्यंत प्रत्येक घर वीजेच्या उजेडाने उजळून निघेल असे उद्दिष्ठ निश्‍चित करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत अद्याप वीज पोहोचली नाही अशा 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवणे आहे. त्यासाठी 2018 पर्यंतची ङ्कुदत देण्यात आली आहे. या योजनेसाठी 16,320 कोटी रुपयांचा निधी घोषित करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकारचे 60% तर विशेष राज्यांमध्ये ज्या राज्यांचा समावेश आहे त्यांना केंद्र सरकार 85%  मदत   करणार आहे. मोफत वीज पुरवठा योजनेचा लाभ हा 2011च्या जनगणनेनुसार सामजिक, आर्थिक आणि जातीय मागास कुटुंबांना मिळणार आहे. या योजनंतर्गत सरकार ट्रान्सफॉर्मर, वीजेची तार, खांब उभे करण्यासा मदत करणार आहे. या योजनेत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्यू-कश्मीर राजस्थान आणि ईशान्येतील राज्यांचा समावेश आहे

‘सोलर पॅक’ही मिळणार
‘सौभाग्य योजने’चा लाभ चार कोटी गरीब कुटुंबांना होणार आहे. आर्थिक जणगणनेतील गरीबांना मोफत वीजजोडणी मिळणार आहे. जनगणनेत नावं नसणार्‍यांना 500 रुपये भरुन वीजजोडणी करता येईल. वीज उपलब्ध नसलेल्या घरांसाठीही सौभाग्य योजनेत तरतूद करण्यात आली आहे. या घरांना मोफत सोलर पॅक देण्यात येतील. या सोलार पॅकमध्ये पाच एलईडी बल्ब आणि एक पंखा असेल. 31 मार्च 2019 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे केंद्रातील मोदी सरकारचे उद्दीष्ट आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याबाबतही योजनेत तरतूद करण्यात आली आहे.