नंदुरबार । शहरातील गोर -गरिबांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी आंदोलन उपोषण करणार्या बेघर संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलावरशा कादरशा यांच्या ’संघर्ष’ला अखेर यश मिळाले आहे. शहरात बांधण्यात आलेल्या 876 घरकुलांचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिली आहे. येत्या आठ दिवसात पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून नंदुरबार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येवून ठराव पारित झाल्यानंतर दिनांक 7 मे 2018 पर्यंत घरकुलांचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी बेघर संघर्ष समितीला दिले आहे. घरकुलांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून गोरगरिबांना हक्काचे घरकुल मिळणार आहे.
7 मे पर्यंत घरकुलांचे वाटप
बैठकीअंती झालेल्या चर्चेनुसार त्यांनी शहरातील लाभार्थ्यांनी नंदुरबार नगरपरिषदेकडे या घरकुलांसाठी प्रस्ताव सादर केले आहे. या लाभाथ्यांची निवड प्रक्रिया येत्या आठ दिवसात पूर्ण होणार आहे. त्यानंतर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवण्यात येणार असून ठराव पारित झाल्यानंतर दिं. 7 मे 2018 पर्यंत घरकुलांचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा गृहनिर्माण समितीपुढे सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पत्र नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी बेघर संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलावरशा कादरशा यांना दिले आहे.
बेमुदत उपोषणाची सांगता
बेघर संघर्ष समितीने दिनांक 10 एप्रिल 2018 पासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घरकुलांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणस्थळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील प्रत्यक्ष भेट देवून येत्या काही दिवसात घरकुलांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती बेघर संघर्ष समितीला दिली आहे. यावेळी समितीचे चिरागोद्दीन शेख, रेहाना खाटीक सह शेकडो कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते. गोर -गरिबांच्या घरकुलांसाठी संघर्ष करणार्या दिलावरशा कादरशा यांच्या ’संघर्ष’ला यश आला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गोरगरीबांकडून आशीर्वाद दिले जात आहे. तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
16 वर्षांपासून लढा
नंदुरबार शहरात फाटा व साक्री रोड येथे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत 876 घरकुल तयार आहेत. या घरकुलांचा लाभ 16 वर्षापासून संघर्ष करणार्या गोर – गरीब लाभार्थ्यांना मिळावा म्हणून बेघर संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलावरशा कादरशा यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आंदोलने -उपोषणे करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी त्यांच्याअध्यक्षतेखाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी, म्हाडाचे अधिकारी व संघर्ष समितीच्या पदाधिकारींची संयुक्त बैठक घेतली आहे.