भुसावळात बहिणाबाई महोत्सवात मार्गदर्शन ; आज ज्येष्ठांना मार्गदर्शन व होम मिनिस्टर कार्यक्रम
भुसावळ- मेहनत व जिद्दीच्या जोरात निश्चित यश मिळते, ज्यांना हात-पाय नाही त्यांनीदेखील यशाची शिखरे पादाक्रांत केली असताना आपल्याला तर देवाने हात, पाय दिले असून इच्छाशक्तीच्या जोरावर आदिवासींचा मुलगा जर आयएएस बनू शकतो तर तुम्ही का नाही बनू शकत नाही? असा प्रश्न उपस्थित करीत गरीबीचे व ग्रामीण भागातील आहोत याचे भांडवल करू नका, जिद्द व चिकाटीच्या जोरावर तुम्ही पण यश हमखास मिळवू शकतो, असे विचार ‘उत्तुंग भरारी घेवूया’ या विषयावर प्रा.युजवेंद्र महाजन यांनी बहिणाबाई महोत्सवात सोमवारी व्यक्त केले. विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी त्यांनी याप्रसंगी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मध्यप्रदेशच्या शिक्षण मंत्री अर्चना चिटणीस, आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, जि.प. शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे, नगरसेवक मनोज बियाणी, पं.स. सभापती प्रिती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुलांनी शिक्षणात अग्रेसर राहिले पाहिजे – अर्चना चिटणीस
मध्यप्रदेशच्या शिक्षण मंत्री अर्चणा चिटणीस म्हणाल्या की, मुलांनी शिक्षणात अग्रेसर राहिले पाहिजे तसेच शिक्षण हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे.
10 महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
बहिणाबाई महोत्सवात विविध क्षेत्रात कार्य करणार्या 10 महिलांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोपटे देवून बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात सीसता बनवट, डॉ.निलीमा नेहते, सुरेखा जावळे, साधना लोखंडे, सुनंदा औंधकर, मंगला पाटील, प्रतिमा नाहाटा, मीरा जंगले, दीपाली चौधरी यांचा समावेश होता.
आज विविध कार्यक्रम
मंगळवार, 3 रोजी दुपारी ज्येष्ठांसाठी डॉ.प्रभाकर जोशी मार्गदर्शन करतील तसेच सायंकाळी पाच वाजता गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान तसेच सायंकाळी सहा वाजता सचिन सावंत होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करतील तसेच रात्री आठ वाजता स्थानिक कलावंत कार्यक्रम सादर करतील.