मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय: गरीब कल्याणसह उज्ज्वला योजनेला मुदतवाढ

0

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यात सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता नोव्हेंबरपर्यंत गरिबांना पाच किलो मोफत तांदूळ किंवा गहूसोबतच एक किलो चणेही मिळणार आहे. या बरोबरच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पुढील ३ महिन्यांसाठी २४ टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदान देण्यात आली आहे. तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत सिलेंडर मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात ७४.३ कोटी इतके लाभार्थी होते. तर त्यात वाढ होऊन मेमध्ये ते ७४.७५ कोटी आणि जूनमध्ये ६४.७२ कोटी इतक्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.

या बरोबरच ज्या कंपन्यांमध्ये ९० टक्के लोक १५ हजारांहून कमी पगार घेतात, त्यांचे पीएफ सरकारने भरले असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. ३ लाख ६७ हजार उद्योगांना फायदा झाला असून ७२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला.