मुंबई । मुंबईतील गरीब रुग्णांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने महापौर निधीतून देण्यात येणारी मदत पाच हजार रुपयांऐवजी दहा हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबई महानगर पालिकेत 1956 रोजी स्थापन करण्यात आलेल्या महापौर निधी समितीच्या माध्यमातून मुंबईतही गरीब रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. मुंबईतील गरीब रुग्नांना हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड पुनर्रोपण, डायलेसीस, कर्करोग इत्यादी गंभीर आजारांसाठी महापौर निधीतून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. महापौर निधीच्या नावे बँकेत जमा असलेल्या दोन कोटी रुपयांच्या कायम ठेवीच्या व्याजातून सदर रक्कम दिली जाते. यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात मुंबईचे नागरपाल, वृत्तपत्रांचे संपादक, शहरातील उद्योगपती, प्रसिद्ध साहित्यिक यांचा समावेश आहे.
नवीन महापौराची नेमणूक झाल्यानंतर या निधीच्या रकमेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, मागील काही वर्षात महापौर निधीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यासाठी मुंबई शहरातील मोठमोठ्या आस्थापनांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवण्यासाठी गरजेचे असल्याचे अनंत नर यांनी म्हटले आहे. महापौर निधी कार्यकारिणी समितीची गेल्या काही वर्षांत एकही सभा झालेली नाही. समितीची शेवटची सभा 22 फेब्रुवारी 2010 रोजी झाली असल्याची माहिती मिळते. महापौर निधी सर्वसाधारण सभेत जमा खर्चाचा तपशील सादर करण्यात येतो. तसेच महापौर निधीत वाढ करण्याबाबतची चर्चा यावेळी केली जाते. मात्र, अनेक वर्षे सभा न झाल्याने महापौर निधीत वाढ करण्यात समितीला अपयश आले आहे.