विवाह समारंभात एकदा वापरलेला ड्रेस कपाटात धूळ साचत ठेवण्याऐवजी तो गरीब महिलांना त्यांच्या लग्नासाठी देण्याची शक्कल अमेरिकेतील एका महिलेने शोधून काढली आहे. डॉनेट्टा हाईन्झ असे या महिलेचे नाव असून ती नेब्रास्का राज्याची निवासी आहे. अनेक नववधूंना लग्न समारंभात पोशाख विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना हा पोशाख उसना देण्याची कल्पना डॉनेट्टा हिला सुचली. त्यानुसार एका महिन्यापूर्वी तो तिने पहिल्यांदा उसना दिला. तेव्हापासून तीन महिलांनी तो स्वतःच्या लग्नात वापरला आहे, तर आठ वधूंनी तो वापरण्यासाठी मागितला आहे. डॉनेट्टाने स्वतः 550 डॉलरमध्ये सेलमधून हा ड्रेस विकत घेतला होता. तिने फेसबुक क्लासिफाइड पेजवर तो प्रदर्शित केला होता. त्यानंतर 48 तासांच्या आत त्याला मागणी येण्यास सुरुवात झाली. मी स्वतः आर्थिक विवंचना आणि बेघरपणाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे लग्नासाठी पोशाख घेण्याची ऐपत नसलेल्या कोणत्याही महिलेला मदत करण्यास मला आनंदच होईल, असे तिने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितले.