गरुड मैदानाच्या ठरावाला विरोध

0

धुळे। शहरात अनेक क्रीडा संकुल व मैदाने उपलब्ध असताना विविध व्यावसायिक उपक्रमासाठी,क्रीडा स्पर्धा वा सभा संमेलनासाठी उपयोगात पडणारे मैदान आता तालुका क्रीडा संकुलाच्या नावाखाली जिल्हा प्रशासन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मैदान वाचविण्यात यावे व यासंदर्भातला ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी शहरातील जनहित नागरी मंचने केली आहे.धुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील गरुड मैदान हे शहराचे भूषण आहे. खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धापासून राष्ट्रीय नेत्यांच्या राजकीय सभांपर्यंत, विविध व्यावसायिक प्रदर्शनांपासून शिवजयंती व्याख्यानमालेसारख्या सामाजिक उपक्रमांपर्यंत, दहिहंडीच्या उत्सवापासून ते धुळे फेस्टीवलच्या सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत अशा विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा गरुड मैदानाला लाभलेली आहे.

पुन्हा क्रीडा संकुल कशासाठी?
शहरात व्यावसायीक क्रीडा प्रकारांसाठी जिल्हा क्रीडा संकुल आहे. क्युमाईन क्लबचे मैदान उपलब्ध आहे. तसेच विविध शाळा व महाविद्यालयांची मैदाने आहेत. महानगपालिकेच्या अनेक जागा खास क्रीडा संकुलांसाठी आरक्षित आहेत. असे असतांना पुन्हा क्रीडा संकुल कशासाठी? पेठ भागातील लहान मुले व तरुणांना गरुड मैदान हे हक्काचे मैदान ठरणार आहे.

40 टक्के भागाचा लचका तोडला
गरुड मैदानावर तालुका क्रीडा संकुल उभारण्याची कल्पना कुणीतरी मांडली व जिल्हा प्रशासनाने ती अंमलात आणायचे ठरवले आहे. काही वर्षापुर्वी वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल बांधण्याला निधी कमी पडत असल्याने व्यापारी संकुल बांधण्याच्या नावाखाली गरुड मैदनाच्या 40 टक्के भागाचा लचका तोडण्यात आला.आता उरलेसुरले मैदान तरी धुळे शहरवासीयांना मुक्तपणे वापरण्यासाठी उपलब्ध असायला हवे. कोणत्याही शहरात रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, स्वच्छता गृहे या भौतिक गरजा असतात. याचप्रमाणे मोकळी मैदाने केवळ क्रीडा संकुले नव्हेत. उद्याने, नाट्यगृहे, ग्रंथालये यादेखील तेवढ्याच महत्वाच्या सामाजिक व सांस्कृतिक गरजा असतात. यापुर्वी गरुड मैदानावर व्यापारी संकुल बांधले गेले. आता तालुका क्रीडा संकुलाच्या नावाखाली गरुड मैदान ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.गरुड मैदानावर व्यावसायिक क्रीडा संकुल उभारण्याऐवजी त्याचे स्वरुप विविधोपयोगी मैदान असेच योग्य राहील.

प्रशासनाने फेरविचार करावा
वर्षातील ठराविक दिवसात येथे व्यापारी प्रदर्शने, बचत गटांची प्रदर्शने भरतात त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गरुड मैदानावर तालुका क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावाचा फेरविचार करावा. तालुका क्रीडा संकुल हे धुळे शहराच्या इतर कोणत्याही योग्य ठिकाणी सहजपणे उभारता येईल पण गरुड मैदान हे शहराच्या इतर कोणत्याही ठिकाणी उभारता येणे शक्य नाही. जिल्हा प्रशासनाने गरुड मैदान हे पुर्वीप्रमाणे सर्वसमावेशक मैदान म्हणूनच विकसित करावे अशी मागणी सचिन सोनवणे, सुधाकर देवरे, सुनिल बैसाणे, धनंजय गाळणकर आदींनी केली आहे.