पुणे : राज्यातल्या 10 महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंझावती प्रचार दौरा सुरु असून, त्याच्या सभांना मोठी गर्दी होते आहे. मात्र, शनिवारी दुपारी दोनला न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणार्या मुख्यमंत्र्यांच्या सभेसाटी गर्दीच न झाल्याने मुख्यमंत्र्यांना सभास्थानी पोचूनही आल्या पावलीच मागे फिरावे लागले. त्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की भाजप वर ओढवली.
महापालिका प्रचार अवघ्या काही तासांत थंडावणार असल्यामुळे शनिवारी पुणे, पिंपरी, नाशिक व मुंबईसह इतर ठिकणी 7 ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभा आयोजिण्यात आल्या होत्या. पुण्यात दुपारी दोनला टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ही सभा होणार होती. त्यानुसार भाजपने नियोजनही केले होते. या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील, असा विश्वास पक्षाला होता. मात्र, सभेच्या सुरुवातीला मोजके कार्यकर्ते उपस्थित असल्याचे चित्र दिसले.
मुख्यमंत्री सव्वादोनला सभास्तानी आले. स्टेजच्या बाजूने मैदानावरील कार्यकर्त्यांची संख्या पाहत 5 मिनिटांत ते पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्याबरोबर मागे फिरले. त्यानंतर मैदानावरील खुर्च्याही काढण्यास सुरुवात करण्यात आली. सभास्थानाजवळ 10 मिनिटे वाट पाहून पुढे पिंपरी- चिंचवडच्या सभेला जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री निघून गेले. या सभेच्या वेळेची चुकीची माहिती दिली गेल्यामुळे पुण्यातील सभा रद्द करण्यात येत असून, काही वेळाने पिंपरी-चिंचवड येथे सभा होणार आहे, असे ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी स्वतःच पुण्यातील सभा रद्द झाल्याची माहिती दिली.
ही सभा रद्द झाल्याची घोषणाही त्यानंतर पक्षाने केली. वेळेबाबत संभ्रमामुळे कार्यकर्ते सभास्थानी येवू शकले नाहीत, असे सांगत गिरीश बापट यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या आज दिवसभरात 7 सभा आहेत. पुण्यातील सभेनंतर नाशिक आणि मुंबईत त्यांच्या सभा होणार असल्याने वेळेअभावी ते पुढच्या सभेला गेले, असे बापट म्हणाले. मुख्यमंत्र्यांची सभा दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास सुरू होईल, असा कार्यकर्त्यांचा समज ि झाल्यामुळे सभेला वेळेत कार्यकर्ते पोचू शकले नाहीत. प्रचारासाठी शेवटचे काही तास बाकी असल्यामुळे उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रचार सुरू ठेवला. त्यामुळे ते वेळेत पोचू शकले नाहीत, असेही बापट यांनी सांगितले.