घणसोली : घणसोलीतील प्रसिद्ध अशा घरोंदा बस थांब्यावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. परंतु मनपाच्या वतीने येथे ताटकळत उभ्या राहणार्या प्रवाशाांना बस येईपर्यंत बसण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. घणसोली सिडको विभाग व घणसोलीलीतील प्रवाशांमुळे रोज लाखो रुपयांचा महसूल परिवहनला मिळत असूनही प्रवाश्यांच्या सुविधेसाठी मनपा परिवहन विभाग काहीही करत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत आहेत.
घणसोली घरोंदा बस थांबा हा घणसोली गाव व घणसोली सिडको विभागाच्या मधोमध आहे. या ठिकाणाहून मनपाच्या 3,9,10,20,55,39,121 अशा विविध मार्गांवर धावणार्या बस उपलब्ध आहेत. बसच्या फेर्या जास्त असल्यामुळे येथे बस थांब्यावर पूर्ण दिवस प्रवाशांची गर्दीही मोठी असते. खारघर, नेरूळ, मुंबई, एपीएसी, वाशी रेल्वे स्थानक, बेलापूर, ठाणे आदी ठिकाणी प्रवासी ये-जा करीत असतात.
प्रवाशांचा येथे जरी मोठा लोंढा जरी येत असला तरी नागरिकांना हवा असणार्या सुविधा दुर्मिळच आहेत. सध्या जरी येथे एकच बाकडा असून तीनच प्रवासी बसतील इतकीच व्यवस्था आहे. त्यामुळे नागरिकांना बसची वाट पाहण्यासाठी एखाद्या झाडाचाच आधार घ्यावे लागत असल्याचे येथील वास्तव आहे. पावसाळा व उन्हाळ्यात हंगामामध्ये प्रवाश्यांची अवस्था येथे दयनीय होत असल्याचे रणजीत कांबळे यांनी सांगितले.किमान येथील नगरसेवकांनी वाईट अवस्था पाहून नागरिकांना बसण्यासाठी बेंच बसविले तरी पुष्कळ होईल अशी प्रतिक्रिया सोमनाथ क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.
घणसोली घरोंदा बस थांब्यावरून दिवसभरात मनपा परिवहन विभागाला लाखो रुपायांचा फायदा होत असताना परिवहन दुर्लक्ष का करते असा सवाल अविनाश रोकडे यांनी विचारला आहे.त्यामुळे परिवहन विभागाने नागरिकांना सुविधा द्याव्यात अशी मागणी केली आहे. या बाबत परिवहन सभापती शाम महाडिक याना विचारले असता,अभियांत्रिकी विभागाला पाहणी करून प्रवाश्याना बसण्याची व्यवस्था करतो असे सांगितले.