गर्दीत ट्रक घुसला; 20 जण ठार!

0

हैदराबाद : वाळूतस्करांविरोधात धरणे आंदोलन करणार्‍या आंदोलकांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसल्याने 20 जण ठार झाले असून, 20 पेक्षाअधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही थरारक घटना शुक्रवारी आंध्रप्रदेशातील चित्तूर तालुक्यातील येरपेडु येथे घडली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून हा ट्रक गर्दी घुसला, त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबाला धडकून ट्रक थांबला नसता, तर आणखी रक्तपात घडू शकला असता, असेही पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आग लागली, विद्युत तार अंगावर कोसळली
शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुतलापट्टी-नायडुपेटा या राज्यमहामार्गावर येरपेडु पोलिस ठाण्यासमोर वाळूतस्करीविरोधात काही नागरिक धरणे आंदोलन करत होते. या आंदोलकांच्या गर्दीत अवजड ट्रक घुसला. हा ट्रक भरधाव होता. त्यामुळे अनेक नागरिक ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले. तसेच, या ट्रकने दुचाकी व इतर वाहनेही उडविली. रस्त्याच्या मधात असलेल्या एका विद्युत खांबावर जाऊन हा ट्रक धडकला. ट्रकच्या धडकेने एका दुकानाला आग लागली, त्यामुळे महामार्गानजीकच्या इतर दुकानांनीदेखील पेट घेतला. या दुर्घटनेत 20 जण जागीच ठार झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती होती.

राज्य सरकारतर्फे 5 लाखांची मदत
रेनीगुंटाचे उपपोलिस अधीक्षक के. एस. नानजंडप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या चाकाखाली येऊन सहा जण जागीच ठार झाले असून, इतर 14 जण हे विद्युत शॉक व आगीत ठार झाले आहेत. ट्रकच्या धडकेने वरच्या बाजूने असलेले उच्चदाबाची विद्युत तार लोकांच्या अंगावर पडली होती. त्यात हे बळी गेले आहेत. जखमींना तातडीने तिरुपती येथील रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले. आंध्रप्रदेश सरकारच्यावतीने मृतकांच्या कुटुंबीयांना तातडीने पाच लाखाची मदत जाहीर केली असून, जखमींचा वैद्यकीय खर्च सरकार करणार आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.