बीजिंग । इंजिनीअर कधी काय करू शकेल याचा काही नेम नाही. चीनमध्ये एका इंजिनीअरने तर आगळे वेगळे लग्न करून खळबळ उडवून दिली आहे. त्याने चक्क एका रोबोटशी लग्न केले आहे. आणि यामागचे कारण म्हणजे त्याला प्रेमात आलेले अपयश. तसेच जेव्हा तो वधू शोधत होता. तेव्हा त्याला वधू मिळाली नाही म्हणून त्याने चक्क रोबोटशी लग्न करण्याचा निश्चय केला. चीनमधल्या या अजब इंजिनियरचं नाव आहे झेंग जीयजीय. तो 31 वर्षांचा आहे. तो आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स एक्स्पर्ट असून झेजियांग प्रांतात राहतो. रोबोट तयार करणे आणि डिझाईन करण्यात तो तरबेज आहे. गतवर्षी त्याने एका स्त्री रोबोटची निर्मिती केली होती. यिंगिंग नावाची ही रोबोट चायनीज अक्षर आणि फोटो ओळखू शकते. याशिवाय ती चिनी भाषेतील काही सोप्या शब्दांचे उच्चारणदेखील करते. झेंगने पारंपरिकचिनी पद्धतीने या रोबोटसोबत लग्न केल्याचे माध्यमांत म्हटले आहे. झेंगने जेव्हा लग्न केले तेव्हा त्या लग्न समारंभात झेंगची आई आणि काही मित्र या सोहळ्यास उपस्थित होते. लग्न सोहळ्यात महिला रोबोट यिंगिंगने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. डोक्यावर लाल रंगाचा स्कार्फ टाकून तिचे तोंड झाकण्यात आले होते. गर्लफ्रेण्ड मिळत नसल्याने हताश झालेल्या झिंगने रोबोटशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या एका मित्राने सांगितले. आपल्या रोबोट पत्नीला चालता यावे आणि घरातील कामात तिने हातभार लावावा यासाठी झेंग तिला अपग्रेड करणार आहे. त्याच्या लग्नाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबिय खूश आहेत. हुवाई कंपनीत काम केलेल्या झेंगने 2014 मध्ये या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याने ड्रीम टाऊन नावाच्या इंटरनेट व्हेंचरमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. त्याने गतवर्षाच्या अखेरीस एका रोबोटची निर्मिती केली होती आणि आपले उर्वरित आयुष्य स्त्री रोबोटसोबत घालविण्याचे ठरविल्याची माहिती एका मित्राने दिली. चिनी पारंपरिक पद्धतीने झेंग आणि रोबोटच्या लग्नाचे सर्व विधी पार पडले.