‘गली बॉय’चे ऑस्कर स्वप्न भंगले; पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर !

0

मुंबई : ‘अपना टाईम आयेगा’ हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळते. मात्र हे वाक्य तोंडावर येण्याचे कारण म्हणजे रणवीर सिंह आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गली बॉय’ चित्रपट. या चित्रपटाने तरुणाईला भुरळ घातली होती. ज्याचे वाईट दिवस सुरु आहे, तो चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत असतो, त्याची सकारात्मकता ‘अपना टाईम आयेगा’ या वाक्यातून दिसते. तरुणाईच्या पसंतीला उतरलेला ‘गली बॉय’ हा चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला. मात्र आता ‘गली बॉय’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ‘द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्स’कडून परदेशी विभागात शेवटच्या दहा चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या अंतिम दहा चित्रपटांच्या यादीत ‘गली बॉय’चा समावेश नाही. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली होती.

द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सने नऊ विभागातील 92व्या अकॅडमी पुरस्कारांची यादी जाहीर केली. यामध्ये डॉक्युमेंटरी फीचर, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, इंटरनॅशनल फीचर फिल्म, मेकअप अॅण्ड हेअर स्टायलिंग, म्युझिक (ओरिजनल स्कोअर), म्युझिक (ओरिजनल सॉन्ग), अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म आणि व्हिज्युअल इफेक्ट्स या विभागांचा समावेश आहे. मात्र ‘गली बॉय’ यापैकी कोणत्याही विभागाच्या यादीत नाही.

21 सप्टेंबर रोजी झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ची ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली होती. समीक्षक आणि प्रेक्षकांनी चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं होतं. त्यामुळे गली बॉयकडून भरपूर अपेक्षा होत्या. परंतु परदेशी चित्रपट विभागाच्या यादीत ‘गली बॉय’चा समावेश न झाल्याने भारतीय प्रेक्षकांची निराशा झाली आहे. या विभागात झेक रिपब्लिकचा द पेंटेड बर्ड, इस्टोनियाचा ट्रूथ अॅण्ड जस्टिस, फ्रान्सचा लेस मिजरेबल्स, हंगेरीचा दोज हू रिमेन्ड, नॉर्थ मॅसेडोनियाचा हनीलॅण्ड, पोलंडचा कोर्पस क्रिस्टी, रशियाचा बीनपोल, सेनेगलचा अटलांटिक्स, दक्षिण कोरियाचा पॅरासाईट या चित्रपटांचा समावेश आहे.