वसिंद : शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या चार शाळांच्या इमारतींचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दोन दिवसांपूर्वी केले. मात्र याच शहापूर तालुक्यातील वासिंदजवळील पिवळी येथील शासकीय आश्रम शाळेच्या इमारतीचे बांधकाम गेली चार वर्ष रखडले आहे. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील आश्रम शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने ते अपुर्ण अवस्थेत आहे. परिणामी या शाळेतील 465 आदिवासी विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात जुन्या पडझड झालेल्या चाळीतील गळक्या वर्ग खोल्यांत बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
अधिकार्यांवर कारवाईची मागणी
पहिली ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या या आश्रम शाळेची अवस्था नवीन इमारती अभावी फार बिकट आहे. येथे एकूण 300 विद्यार्थी व विद्यार्थीनी निवासी आहेत. रखडलेल्या आश्रमशाळा वसतिगृहाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक आता विचारत आहेत. शिरोळ, दहागाव, शेणवा, डोळखांब या चार शाळांच्या इमारतींच्या बरोबरच पिवळी येथील नवीन इमारतीचे कामही सुरु झाले होते; पण केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, कंत्राटदार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे येथील आश्रमशाळा व वसतिगृहाच्या इमारतीचे काम रखडले आहे, असा आरोप येथे शिक्षण घेणार्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. यास जबाबदार असणार्या आदिवासी विकास विभागाचे शासकीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
कारवाईचे संकेत
शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कार्यपध्दतीमुळे या वर्षी पुन्हा पिवळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गळक्या जीर्ण झालेल्या धोकादायक चाळीतील वर्ग खोल्यांत कसेबसे शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पडझड झालेल्या व गळती लागलेल्या या इमारतीमध्ये येथील विद्यार्थ्यांना राहावे लागत आहे. प्रसाधनगृह, शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. अधीक्षक, अधिक्षका, मुख्याध्यापक याच्या निवासी चाळींना देखील पावसाळ्यात गळती लागल्याने ते त्रस्त आहेत. याबाबत राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी पिवळी आश्रमशाळेच्या रखडलेल्या इमारतीच्या बांधकामांबाबत तात्काळ माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे संकेत दिले आहेत.