गळफास घेवून विवाहितेची आत्महत्या

0

धुळे । शहरातील साक्री रोडवरील भिमनगरात एका विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केलेची घटना आज पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. साक्री रोडवरील भिमनगरात राहणार्‍या सुमीत कुवर यांच्याशी वर्षभरापुर्वीच दोंडाईचा येथील अक्षदा हिच्या विवाह झाला होता. सुमीत कुवर हे राज्य राखीव पोलीस बल कर्मचारी असून सध्या ते बंदोबस्तासाठी नाशिक येथे कार्यरत आहेत. भिमनगरात सासू, सासरे आणि अक्षदा हे तिघे राहतात रात्री नेहमीप्रमाणे हे तिघे झोपी गेले. पहाटे 5 वाजून 20 मिनीटांनी या भागात पिण्याचे पाणी आले. त्यामुळे सुन अक्षदा हिला उठविण्यासाठी सासू सासरे गेले असता तिच्या खोलीमध्ये साडीच्या आधार घेवून तिने पंख्याला गळफास घेतला असल्याचे समोर आले.

सदरील घटना रविवारी रात्री 9 ते सोमवारी पहाटे 5 वाजून 20 मिनीटांच्या दरम्यान (वेळ निश्‍चित नाही) घडली असल्याचा अंदाज आहे. तिला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता सकाळी 6 वाजून 50 मिनीटांनी डॉ. अश्‍विनी भामरे यांनी मयत घोषीत केले. या घटनेची सुरेश इसन कुवर रा.भीमनगर, साक्री रोड, धुळे यांनी सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास धुळे शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षा जाधव करीत आहेत.