धुळे। मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल नालंदाच्या मागे असलेल्या एका शेतात महिलेचा गळफास देवून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान त्या महिलेच्या खून अनैतिक संबधातून करण्यात आला असून तीच्यावर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल मागे नारायणभाई शामजी पटेल यांच्या मालकीच्या शेतात मयत 45 वर्षीय महिला तिच्या दोन मुलींसोबत गेल्या 20 वर्षापासुन रखवालदार म्हणून काम पाहत होती. काल सकाळी तिचा मृतदेह झोपडीपासून काही अंतरावर गळफास दिलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी हिंमत जाधव, चाळीसगाव पोलीस स्टेशनचे एपीआय हेमंत पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार महिलेला साडीने गळफास देवून तिचा खून करण्यात आला असावा. हा खून अनैतिक संबधातून करण्यात आला असून तिच्यावर बलात्कार झाला असल्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. दोन्ही शक्यता लक्षात घेवून पोलीस तपास करीत आहेत.
अवधान येथे तरुणाला मारहाण
धुळे तालुक्यातील अवधान येथील एसबीआय बँकेच्या शाखेजवळ बँकेतील रांगेत उभे असतांना नंबर लावण्याच्या कारणावरुन तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाडी उपनगरातील दंडेवाला बाबानगरात म्हाडा वस्तीत राहणारा कृष्णा प्रल्हाद पारखे हा तरुण दि.24 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अवधान येथील एसबीआय बँक शाखेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असतांना नंबर लावण्यावरून वाद झाला. त्यातून प्रितेश वाघ, शुभम वाघ, दत्तू मराठे, सावकारे या चौघांनी त्यास हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कृष्णा पारखे याने मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडदे येथे एकास मारहाण
साक्री तालुक्यातील घोडदे येथील रहिवासी समाधान बापू सतोळे यांना पत्नीकडे जेवण मागत असतांना जेवण बनविले नाही, या कारणावरून राधाबाई समाधान सतोळे, आनंद राजाराम माळी, चिल्या भिकन माळी, भुर्या आनंद माळी, भिल्या भिकन माळी रा. घोडदे यांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी समाधान सतोळे यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील 5 जणांविरूध्द भादंवि कलम 325, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी मृतदेह आढळला
धुळे शहरातील गल्ली क्रमांक 2 व 3 बोळीतील गोपाल टी हाऊसजवळ दि.25 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अश्विनी भामरे यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हेकॉ रवींद्र राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.