बारामती । बारामती नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अपयश आले असून कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत.
याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय जाधव यांनी सांगितले. शहरातील लॉजचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच दोन पथकांची निर्मिती केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. विजय गव्हाळे यांना याबाबत विचारणा केली जात आहे. आम्ही लवकरच हल्लेखोरांपर्यंत पोहचू असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.
या घटनेमुळे बारामती शहरात घबराटीचे वातावरण आहे. बारामती नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी नगरपालिकेची सुत्रे हाती घेतल्याबरोबर संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविले जातील असे जाहिर केले होते. मात्र अद्यापही हा प्रस्ताव धुळखातच पडून आहे. तत्कालिन नगराध्यक्ष योगेश जगताप यांनीसुध्दा हा प्रस्ताव महत्त्वाचा असून याची अंमलबजावणी केली जाईल. असे सांगितले होते. मात्र हे केवळ आश्वासनच ठरले आहे.