पोलिसांनी नोंदविले सात जणांचे लेखी जबाब ; कर्मचार्यांनी नाकारले आरोप
भुसावळ- शेतजमीन एन.ए.करण्यासाठी दिल्यानंतर आपली फाईल गहाळ करण्यात आल्याने मुख्याधिकार्यांसह सात जणांविरुद्ध खंडणी व कर्तव्यात कसूर केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांकडून लेखी मागितल्यानंतर मुख्याधिकारी यांनी फाईल गहाळ प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा करीत 2013 पूर्वीचे हे प्रकरण असल्याचे सांगत हे जमीन मुळात सरकारजमा झाल्याचा लेखी जवाब शहर पोलिसांना दिला आहे तर अन्य कर्मचार्यांनीदेखील दमदाटी केली नसल्याचे सांगत या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे लेखी लिहून दिले आहे.
आपल्या कार्यकाळापूर्वीचा विषय -मुख्याधिकारी
मुख्याधिकार्यांनी शहर पोलिसात दिलेल्या जवाबानुसार 2013 पूर्वीचे हे प्रकरण असून त्यावेळी आपण पालिकेत मुख्याधिकारी म्हणून नव्हतो त्यामुळे फाईल गहाळ झाल्याच्या प्रकाराशी आपला कुठलाही संबंध येत नाही शिवाय लाच मागितल्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी लेखी दिले आहे. चौधरी सांगत असलेली शेतजमीन मुळातच शासनजमा झाली असून फाईल आपल्याकडे येण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी लेखी जवाबात म्हटले आहे.
कर्मचारी म्हणतात, आरोप बिनबुडाचे
चौधरींकडून तीन लाखांची मागणी केल्याप्रकरणी आरोप असलेल्या अनिल चौधरी, प्रवीण जोंधळे, विजयसिंग चव्हाण, अख्तर खान, पंकज पन्हाळे व राजू नटकर यांचेही शहर पोलिसांनी लेखी जबाब नोदविले. या कर्मचार्यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले असून या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे जवाबात म्हटले आहे. अरेरावी केलेली नाही शिवाय पैसेदेखील आम्ही मागितलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यातील दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून पंकज पन्हाळे हे नुकतेच बदलून आले आहेत.
वरीष्ठांच्या सूचेनेनुसार कारवाई -गंधाले
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले की, मुख्याधिकार्यांसह अन्य कर्मचार्यांचे लेखी घेण्यात आले असून वरीष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी होवून सरकारी व्यक्तीने फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल होईल, असेही त्यांनी सांगितले.