– विराट पर्वाला आजपासून प्रारंभ; 37 हजार प्रेक्षकसंख्या; सर्व तिकिट अवघ्या पंधरा दिवसांत संपली
पुणे : कसोटीपाठोपाठ एकदिवसीय व टी-20 सामन्यांसाठीही विराट कोहलीची निवड झाल्याने भारतीय क्रिकेटमधील विराटपर्वाला रविवारपासून खर्या अर्थाने सुरवात होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय व टी-20 सामन्यांना रविवारपासून सुरूवात होत असून, या मालिकेतील पहिला सामना रविवारी गहुंज्यातील मैदानावर रंगणार आहे. कॅप्टन कूल म्हणून सर्वपरिचित असलेल्या महेंद्रसिंह धोनीने अचानकच एकदिवसीय व टी- 20 चे कर्णधारपद सोडल्याने विराटची क्रिकेटच्या या तिन्ही स्वरुपांसाठीच्या संघांसाठी अपेक्षेप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. धोनी आता फक्त यष्टिरक्षक- फलंदाज म्हणून खेळणार आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली केवळ खेळाडू म्हणून धोनी प्रथमच खेळणार असल्यानेही त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. धोनी मैदानावरही शांत चित्ताने डावपेच लढवत होता, तर विराट काहीसा आक्रमक आहे. कर्णधाराच्या या वेगळ्या शैलीबाबतही क्रिकेटरसिकांत उत्सुकता आहे.गेल्या वर्पी भारतातच झालेल्या मालिकेत भारतीय चमूने न्यूझीलंडला चारीमुंड्या चित केले होते. त्यानंतर आलेल्या पाहुण्या इंग्लिश संघास कसोटीत 4-0 अशी सरळ धूळ चारली आहे. आता नव्या वर्षात सुरू होणार्या मोसमात नवा कर्णधार विराटची कामगिरी कसी होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय व तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने विराटपर्वास सुरवात होत आहे.
गहुज्यात रविवारी पहिला सामना रंगणार आहे. दिवस-रात्र अशा रंगणार्या या सामन्यात सलामीचा फलंदाज शिखर धवन, शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलु युवराज सिंग पुनरागमन करत आहेत. गेल्या मोसमात पूर्ण फॉर्मात असलेल्या विराटला या खेळाडूंची कशी साथ लाभते, हे या सामन्यातून दिसून येईल. इंग्लंडच्या संघातही जेसन रॉय, डेव्हिड विली, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, सॅम बिलिंग्ज आणि लियाम डॉसन हे अष्टपैलू खेळाडू संघात परतले आहेत. त्यांच्या जोडीला सध्या भरात असलेले ज्यो रूट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स आहेत. त्यामुळे इयन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ दमदार लढत देईल.
मुंबईत झालेल्या सराव सामन्यात इंग्लिश संघाने विजय मिळवत आपला विश्वास वाढवला आहे. त्यामुले गहुंज्यातील सामन्यात अधिक दमदार कामगिरीसाठी इंग्लिश खेळाडू उत्सुक आहेत. दरम्यान, 37 हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या गहुजे स्टेडियममधील सर्व तिकिट अवघ्या पंधरा दिवसांत संपली आहेत. या मैदानाकडे जाऊ इच्छिणार्या प्रेक्षकांसाठी पीएमपीएमलने खास बसफेर्या ठेवल्या आहेत. तसेच, मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर दिवसभरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी विशेष दक्षता घेतली असून, पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.