गहुंजेवर आज धावांची बरसात?

0

जवळपास चार वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुण्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आज रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज होणार्‍या दिवस-रात्र दंगलीपासून एकदिवयीस पाच सामन्यांची मालिका सुरू होत असून, विराट कोहली आणि कंपनी कसोटी मालिकेपासूनचे वर्चस्व कायम राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे इयान मॉर्गनचा इंग्लंड संघ नव्या वर्षांची सुरूवात विजयाने करण्यासाठी सज्ज आहे. पुण्यातील गहुंजे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात 13 ऑक्टोबर 2013 रोजी लढत झाली होती. त्यानंतर आज सामना होतो आहे. त्यावेळी झालेल्या लढतीत भारताला 72 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्या कडू आठवणी कोहलीचा संघ यावेळी पुसणार का याचीच उत्सुकता आहे.

इंग्लंडच्या एकदिवसीय संघात बहुतांशी खेळाडू जरी मूळ कसोटी संघातीलच असले, तरी मॉर्गनकडे नेतृत्व आले असून काही अष्टपैलू खेळाडू या मालिकेसाठी संघात परतल्याने इंग्लंड संघाची ताकद काहीशी वाढली आहे. जेसन रॉय, डेव्हिड विली, अ‍ॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, सॅम बिलिंग्ज आणि लियाम डॉसन भारतासमोर मोठे आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे कसोटीपेक्षा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची फलंदाजी भक्कम वाटते. या जोडीला सध्या भरात असलेले ज्यो रूट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स आहेत. त्यामुळे भारताला आजच्याच नव्हे तर सर्व सामन्यांत सावध राहावे लागणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपूवीृ भारतीय संघ ही अखेरची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळत असल्याने त्या स्पर्धेसाठीचा सराव करण्याची नामी संधी भारतीय संघाला आहे. वेगवान गोलंदाज महंमद शामी व भुवनेश्‍वर कुमार जायबंदी झाले असून, शामी या पूर्ण मालिकेलाच मुकणार आहे. भुवनेश्‍वर कुमारने तंदुरूस्ती सिद्ध केली असली, तरी त्याचे असे वारंवार दुखापतग्रस्त होणे संघासाठी हानिकारक आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पूर्ण फीट असला, तरी कसोटी मालिकेत फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. उमेश यादववरच सध्या सर्व आशा केंद्रीत आहेत. हार्दिक पांड्या मधल्या षटकात चांगली गोलंदाजी करेल. मात्र, त्याला अजून नवा चेंडू परिपूर्ण हाताळण्याची कला अवगत करावी लागणार आहे. झहीर खानच्या निवृत्तीनंतर त्याची जागा घेणारा एकही गोलंदाज आजही भारताला मिळालेला नाही. फिरकी गोलंदाजीत एकीकडे अश्विन-जडेजालाच विश्रांती देण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे. मात्र, जयंत यादव दुखापतीने ही मालिका खेळू शकणार नाही; शिवाय अक्षर पटेलही जायबंदी झाला आहे. अशा स्थितीत अश्विन व जडेजाला संघाबाहेर ठेवून आपण मोठी चूक केली असेच घडण्याची शक्यता जास्त आहे.

झारखंडचा नवोदित डावखुरा फिरकी गोलंदाज शहाबाज नदीमला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने रणजी स्पर्धेत सरस कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधले आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय मालिकेसाठी संघात परतल्याने पुन्हा निराळेच चैतन्य पसरले आहे. बेस्ट फिनिशर ही ओळख काही काळ त्याने गमावली होती. मात्र, न्यूझीलंडविरूद्ध त्याची बॅट पुन्हा एकदा तळपली व टीका बंद झाली. धोनी संघात परतल्याने भारताची फलंदाजी खोलवर व भक्कम बनली आहे. रहाणे, राहुल, कोहली, नायर, रैना, जडेजा, अश्विन अशी भक्कम फलंदाजी इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या उभारेल किंवा त्यांच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलागही करेल. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने डीआरएस प्रणाली स्वीकारली व त्याचा खूप मोठा लाभ झाला. हीच प्रणाली या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतही राहणार असल्याने भारतासाठी लाभदायक ठरणार आहे. या मालिकेपासून आता विराटला एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत आणखी काही विक्रम साकार करण्याची संधी आहे. एकदिवसीय कारकिर्दीत साडेसात हजार धावांचा पल्ला पार केल्यानंतर त्याला आठ हजार धावांचा मैलाचा दगड पार करण्याची संधी आहे. ज्या भरमसाठ धावा त्याने कसोटी मालिकेत केल्या, त्या पाहता या तीन सामन्यांत हा टप्पा तो सहज पार करेल, असा विश्‍वास वाटतो. दुसरीकडे श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला (28 शतके) मागे टाकण्याचीही त्याला संधी आहे. त्

– अमित डोंगरे
मुक्त क्रीडा पत्रकार, पुणे