पुणे । मुंबई उच्च न्यायालयाने गहुंजे स्टेडियम प्रशासनाला पवना नदीतून सुरू असलेला पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप न्यायालयाचे पत्र प्राप्त झाले नसल्याने मीटर सील केले जाणार नाही असे, येथील उपविभागीय अभियंते एन.एम मठकरी यांनी सांगितले आहे. यामुळे अजूनही पाणी उपसा सुरूच आहे. आयपीएलचे सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार असून या सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला केला होता. एवढेच नव्हे तर यावर आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेशही खंडपीठाने असोसिएशनला दिले होते. महाराष्ट्रात होणार्या आयपीएल सामन्यांना अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला विरोध दर्शवत एका संस्थेने उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पवनेतून 24 तास पाणी उपसा
आयपीएलच्या सामन्यासाठी पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर 24 तास पवना नदीतून पाणी उपसा केला जातो. ज्या ठिकाणी गहुंजे येथील गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी कपात केली जाते, मात्र स्टेडियमसाठी संपूर्ण 24 तास पाणी उपसा केला जातो. स्टेडियमला येणारे पाणी हे टँकर मधून न येता थेट पवना नदीमधून पाईप द्वारे उपसले जाते. नदीकिनारी स्टेडियमचे उपसा केंद्र उभारण्यात आले आहे. याबाबत पवना धरणाचे उपविभागीय अभियंता यांनी गहूंजे स्टेडियम मध्ये अतिशय कमी पाणी उपसले जाते असे सांगितले. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे कोणताही लेखी पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत मीटर सील केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.