श्रीनगर: माजी कर्णधार सौरव गांगुलीने जेव्हा राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळला होता. तेव्हा त्याला लक्ष्य करण्यात आले नाही. मात्र, काश्मीरमधील अस्थिर स्थितीमुळे परवेझ रसुलला लक्ष्य करण्यात आले, असे वक्तव्य परवेझच्या वडिलांनी केले आहे. यावेळी रसूलच्या वडिलांनीही त्याच्या च्युईंगम चघळण्याच्या प्रकरणावरून त्याला सुनावले देखील आहे. राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळण्याचे प्रकरण काही नवे नाही, याआधी देखील अनेक क्रिकेटपटूंनी असे केले आहे. पण राष्ट्रगीतावेळी आपल्या तोंडात काहीही न ठेवण्याची जबाबदारी परवेझची होती. त्याने काळजी घ्यायला हवी होती, असे परवेझच्या वडिलांनी म्हटले.
राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळण्याचा प्रकार याआधी अनेक खेळाडूंनी केला होता. माझा मुलगा त्यात अपवाद नाही. पण त्याने नक्कीच काळजी बाळगण्याची गरज होती, असे रसूलच्या वडिलांनी सांगितले. परवेझकडून यापुढे अशी चूक होणार नाही, याची काळजी घेण्यासही सांगितल्याचे ते म्हणाले. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी उभे असताना च्युईंगम चघळण्याच्या प्रकरणावरून जम्मू-काश्मीरचा युवा खेळाडू परवेझ रसूल सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली. नुकतेच परवेझने एका मुलाखतीत या प्रकरणावर आपला खुलासा देत क्रिकेटपटूंना खेळू द्या, त्यांना राजकारणात खेचू नका, असे विधान केले होते.