चिंबळी । मुंबई वृत्तपत्र लेखक व मासिक कोकणस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज कार्य करणार्या व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भोसे (ता. खेड) येथील प्रगतशील शेतकरी व शेतकरी बचाव आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष गजानन सिताराम गांडेकर यांना गौरविण्यात आले.
मुंबई येथील पोईसर कांदिवलीमधील महिला आधार भवन सभागृहात सिनेअभिनेते, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याचे मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष तुकाराम रेवडेकर व प्रमुख कार्यवाहक तुकाराम दळवी यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ सिनेअभिनेते रमेश देव, आमदार विजयभाई गिरकर, स्थानिक नगरसेवक, पत्रलेखक संघाचे सर्व सदस्य, पदाधिकारी व पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सिनेअभिनेते रमेश देव व आमदार विजयभाई गिरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गजानन गांडेकर यांना सन्मानित करण्यात आले. गांडेकर यांच्या या निवडीबद्दल खेड तालुक्यात विविध परिसरातील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी गाडेंकर याचे अभिनंदन व कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.