मुंबई । माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे देशाच्या इतिहासात योगदान मोलाचे असून राज्य पुस्तक महामंडळाने 9 वीच्या इतिहासाच्या पुस्तकात त्यांच्याविषयी वादग्रस्त पाठ दिला असल्याने विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. हा सरकारचा अजेंडा आहे का? असा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाजाच्या सुरुवातीलाच 57 च्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत याबाबत निषेध व्यक्त केला.
इयत्ता 9 वीच्या इतिहासाचे पुस्तकातील गांधींबाबतचा चुकीचा मजकूर वगळण्यात यावा तसेच या गोष्टीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी विखे पाटील यांनी केली. याबाबत शासनाने लक्ष घालावे अशा सूचना अध्यक्षांनी केल्या मात्र विरोधकांनी तात्काळ कार्यवाहीची मागणी करत जोरदार गोंधळ घातला.
-राधाकृष्ण विखे-पाटील
आजपर्यंत कुणालाही करता आले नाही ते राजीव आणि इंदिरा गांधींनी केलेय. जनतेच्या भावना दुखावल्या असून आंदोलन सुरू झाली आहेत. बदनामीकारक लेखन आम्ही सरकारमध्ये असतानाही आले होते मात्र आम्ही ते वगळले. यात राजकारण करू नका, महामंडळ कोण नेमत? सभागृह सर्वोच्च, तुम्ही निर्णय घ्या, मंडळाला सांगून ते वादग्रस्त शब्द मागे घ्या अशी मागणी केली.
-अजित पवार
जबाबदारी शिक्षण मंडळाची; चूक तपासून सकारात्मक निर्णय घेणार…
ही जबाबदारी शिक्षण मंडळाची असून चूक तपासून सांगितले जाईल आम्ही तुमच्या मताशी सहमत असून सभागृहाच्या भावना महामंडळाला पोहोचवून सकारात्मक निर्णय घेवू.
– गिरीश बापट
शालेय अभ्यासक्रमात इतिहास शिकविताना प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा समावेश करण्यात येतो. कोणाचीही बदनामी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना देणार आहे.
-विनोद तावडे