गांधीजींची १५० वी जयंती विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

0

जळगाव- महात्मा गांधी यांची १५० वी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती २ आॅक्टोंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरी करण्यात येणार आहे. यामुळे सुवर्ण महोत्सवानिमित्त यंदा २ आॅक्टोंबर २०१८ ते २ आॅक्टोंबर २०१९ अशा वर्षभरात विविध कार्यक्रम राबवून गांधीजींच्या विचारांना उजाळा देण्याबाबातचे आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे सर्व शाळांना देण्यात आले आहे.

येत्या २ आॅक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातील, एवढेच नव्हे तर वर्षभरात कोणते कार्यक्रम राबवावे त्याबाबत वेळापत्रक सुध्दा जारी केले आहे़ या महोत्सवानिमित्त वर्षभर महात्मा गांधी यांची सहकार चळवळ, सविनय कायदेभंग आंदोलन, भारत छोडे आंदोलन आदी विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

तसेच सर्व शाळांमधून विज्ञान यात्रा, प्रदर्शन आयोजित केले जातील. यात स्वच्छ भारत मिशन, जलसंधारण विषयक तसेच सौर उर्जैच्या प्रसारावर भर देणाºया प्रकल्पांचा समावेश असणार आहे़ एवढेच नव्हे तर महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. सोबतच प्रश्न मंजुषा स्पर्धा, गांधीवादी विचारवंतांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.