गांधीजींचे तत्त्वज्ञान समजण्यासाठी आत्म्याचा शोध घ्या

0

जळगाव । आजचे युग इन्स्टंट आहे, दोन मिनिटात सर्व गोष्टी तयार लागतात. अशा परिस्थितीत गांधीजींचे तत्वज्ञान समजुन घ्यायचे असल्यास आपल्या आत लपलेल्या महात्म्याला शोधणे आवश्यक आहे. बापुंचा प्रवास मोहन ते महात्मा हा प्रवास आत्मशोधातून झाल्याचे प्रतिपादन महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि गांधीयन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि गांधीयन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासुन नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पला सुरवात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, गुजरात विद्यापीठाचे प्रो. सुदर्शन अय्यंगार, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सेवादास दलुभाऊ जैन, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरवात झाली. नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पला 18 राज्यातून युवक उपस्थित आहेत.

मुलभूत प्रश्नांचा विचार कोण करतो?
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिवेगावकर म्हणाले, ग्रामविकासाची मुहूर्तमेढ गांधीजींच्या खेड्याकडे चला यातूनच झाली. ग्रामस्वराज्याचा पाया म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाल्या. पण दुर्दैव असे की या संस्थाकडे ग्रामविकासाचे प्रश्न येतच नाही. मग मुलभूत प्रश्नांचा विचार करणार्‍या संस्था आहेत कुठे? स्वातंत्र्यापुर्वी अंग्रेज साहेब होते, आता देसी साहेब आले आहेत, प्रश्न मात्र तसेच आहेत. माझ्या दृष्टीकोनातून या शतकातले खरे रॉकस्टार गांधीजी आहेत. पण आजच्या व्हाटसअप आणि फेसबुकच्या पोस्टच्या भडीमारात सत्य आहे कुठे, याचा शोध घेतला जात नाही. लिहिणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सामान्य माणसाला स्वातंत्र्याची भीती का वाटते. गांधीजी मात्र त्यांच्या वर्तनातून सर्वांना विचार स्वातंत्र्य व्यक्त करणारा लीडर करू पाहत होते. या लीडरशीप कॅम्पमधुन बाहेर पडणारा युवक हा सत्यान्वेशी असेल, याचा मला विश्वास वाटतो.

अहिंसा म्हणजे कायरता नव्हे…
युवकांना मार्गदर्शन करताना तुषार गांधी म्हणाले, आजच्या युवकांना गांधीजी कळाले ते मुन्नाभाई मधुन. स्वत:च्या प्रयत्नातून गांधींना समजण्याचा प्रयत्न व्हायला. बापु महात्मा व्हायच्या आधी मोहन होते, पण मोहन ने आपल्यातील उणीवांवर मात केली, सत्याची सिद्धी जाणली आणि ते महात्मा झाले. युवकांनी देखील आपल्यातील उणीवांवर मात करावी हा या कॅम्पचा उद्देश असल्याचे सांगून ते म्हणाले, मोहनची भक्ती करू नका, कारण भक्ती मध्ये भ्रष्टाचार येतो. भक्ती अंध बनते. व्याभिचार दिसत नाही, पाखंड सुरू होते. आजच्या पिढीने आत्म्याची कवाडे बंन केली आहेत. अभ्यास, मार्कांची चढाओढ, अविरत स्पर्धेत युवक आपले स्वत्व विसरून बसला आहे. शिक्षण ते नसते जे तुम्हाला विचार करण्यापासुन परावृत्त करते. अहिंसा ही बापुंची ओळख होती, गालावर चापट मारणार्‍याच्या मनात तुमच्या वर्तनाने असे काही निर्माण करा की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला पाहिजे. अहिंसा म्हणजे कायरता नव्हे, भित्रेपणा नव्हे. तुमच्या घराचे, कुटुंबाचे रक्षण तुम्हाला करावेच लागेल. स्त्री शक्तीची प्रखरता बापुंनी ओळखली होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या भोवतालच्या मुलींना आत्मनिर्भरतेचे धडे द्यायला सुरवात केली होती. आत्मनिर्भरता ही आत्म्याच्या प्रबलतेवर अवलंबून असते. प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावरच लीडर घडत असतो. लीडरशीप म्हणजे बरोबरीच्या लोकांना घेऊन चालणे. अशा प्रकारच्या लीडरशीपचे मोठे उदाहरण मला अलीकडच्या काळात भरवलाल जैन यांच्यात दिसते. त्यांनी सहकार्‍यांना जबाबदारीचे भान देऊन त्यांना आत्मनिर्भर केले. तरुणांनी इनोवेटर बनले पाहिजे. साहसी बनायला हवे. आपल्या देशात सर्वात साहसी गांधीजी होते. श्रद्धा, आत्मा आणि साहस हे कधीच संपत नाही. जो बदल तुम्हाला अपेक्षित असतो, तो आधी स्वत:मध्ये आणला पाहिजे.

गांधीतत्वात नायकाचे गुण
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, नेतृत्वाची परिभाषा काय असावी, नायकात कोणते गुण असावे, याचा विचार करताना आपण गांधीजींच्या तत्वापाशी येऊन थांबतो. सत्य, अहिंसा, प्रेम, सदभावना या तत्वांचा स्वीकार केल्यास नेतृत्वगुणांचा विकास होऊ शकतो. मोठे भाऊ नेहमी म्हणत श्रम केल्यास शाश्वताची निर्मिती होते. त्यांनी आम्हाला श्रमाचा संस्कार दिला. पैशाच्या जागी कामाचा, संपत्तीच्या ठिकाणी परिश्रमाचा आणि वैभवाच्या ऐवजी जबाबदारीचा वारसा त्यांनी आम्हाला दिला आहे, त्यामार्गाने आमची वाटचाल सुरू आहे. सदाचार, परिश्रम, चारित्र्य, ज्ञान, वैराग्यविहिन उपासना असे शाश्वत तत्वज्ञान मोठे भाऊ आमच्यासाठी सोडुन गेले आहेत. या तत्वांच्या आचरणात लीडरशीपची बीजे आहेत. युवकांनी देखील या तत्वांचा अवलंब केल्यास, स्वीकार केल्यास तुम्हाला लीडर होण्यापासुन कुणी रोखु शकणार नाही.

तंत्रज्ञान करतेय नेतृत्व
लीडरशीप कॅम्पच्या उद्देशाबाबतची माहिती देऊन सुदर्शन अय्यंगार म्हणाले, नेतृत्व फक्त राजकीय नसते, समाजाला दिशा देण्याचे, चांगल्या वाट्याला नेणारे नेतृत्व असावे. पण अलिकडे आपण पाहतो, जगभरातून तंत्रज्ञान नेतृत्वाची जागा घेऊ पाहत आहे. आजची पिढी तंत्रज्ञानाच्या मार्‍याला बळी पडत आहे, तंत्रज्ञान आपल्याला जीवनापासुन दूर नेते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या मार्‍यात आपण जिव्हाळा, प्रेम विसरत आहोत, केवळ औपचारिकपणाने वागून जिव्हाळा निर्माण होत नाही. त्यासाठी युवकांनी आतून स्ट्राँग बनले पाहिजे. आतुन स्ट्राँग बनण्यासाठी आत्म्याच्या मार्ग शोधावा लागेल, सत्याचा मार्ग शोधावा लागेल. या कॅम्पमधुन युवकांना सत्याचा, आत्म्याचा मार्ग शोधण्यास मदतच होईल असे वाटते. कार्यक्रमाच्या सुरवातीला अनुभूती रेसीडेन्शीयल स्कुलच्या मुलांनी ‘वैष्णव जनतो’ हे भजन सादर केले. सुत्रसंचालन अश्विन झाला यांनी केले. आभार विनोद रापतवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. जॉन चेन्नादुराई यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

युवकांशी संवाद
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी उदघाटनाच्या सत्रानंतर युवकांशी संवाद साधला. युवकांनी त्यांना गांधीजी नेमके कसे होते. फाळणीच्या संदर्भात सत्यता, त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग आदी विषयांवरून युवकांनी प्रश्न विचारले. युवकांच्या शंकाचे समाधान होईल अशी उत्तरे तुषार गांधी यांनी दिली. यावेळी मु. जे. महाविद्याल, नुतन मराठा महाविद्यालय, एसएसबीटी महाविद्याल आणि विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे युवक उपस्थित होते.