गांधीतीर्थ येथे नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन

0

देशातील २० राज्यातील प्रतिनिधींचा सहभाग, तुषार गांधींची उपस्थिती
जळगाव – देशाच्या सामाजिक, विकास आणि प्रगतीमध्ये युवाशक्तीचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. अशा युवावर्गात गांधीयन नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाना गांधी तीर्थ येथे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्प’ आयोजण्यात आलेला आहे. महात्मा गांधीजी आणि कस्तुरबा अर्थात ‘बा-बापू १५० व्या जयंती’ वर्षाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन २६ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आयआयटी पवईचे चेअर प्रोफेसर डॉ. सुदर्शन आयंगार, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक सेवादास दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कॅम्पसाठी भारतातील २० राज्यातील तसेच नेपाळ असे दोन्ही मिळून सुमारे ६५ युवा-युवतींचा यात सहभाग आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशनने आयोजलेल्या ‘नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प’मध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये अनुकूल जीवनशैली याबाबत सोनम वांगचूक उपस्थितांशी सुसंवाद साधतील. लडाखमधील एक अभियंता आणि शिक्षण सुधारक म्हणून त्यांचा लौकीक आहे. ‘थ्री इडियट’ चित्रपटात आमीर खानने त्यांची भूमिका साकारली आहे. ‘गाँधी प्रासंगिकता का मर्म’ या विषयावर सुप्रसिद्धी गांधी विचारवंत, लेखक डॉ. विश्वास पाटील, ‘सत्य और अहिंसा के प्रकाश में खुद को जाने’ – प्रो. एम.पी. मथाई, ‘आज के संदर्भ में शाश्वत पर्यावरण का प्रारूप’ याबाबत पर्यावरण व युवक विषयावर प्रभुत्व असलेले ‘गतिमान संतुलन’ या नियतकालिकाचे संपादक डॉ. दिलीप कुलकर्णी, ‘गाँधीवादी आर्थिक विचारधारा’ याबद्दल आदिवासी जीवनशैलीचा अभ्यास करणाऱ्या प्रा.डॉ. निमिषा शुक्ल विचार मांडतील. ‘सामाजिक सद्भावना’ या विषयी समाजकारण आणि युवक या विषयाचे तज्ज्ञ जावेद आनंद मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तुषार गांधी, डॉ. सुदर्शन आय्यंगार, डॉ. जॉन चेल्लादुरई हे देखील युवा-युवतींशी सुसंवाद साधणार आहेत.