गांधीनगरातील घरफोडीनंतर मोनुसिंग बावरीने पैसे डान्सबार, जुगारात उडविले

0

जिल्हापेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 5 लाख 60 हजारांचा एैवज जप्त

जळगाव : शहरातील गांधीनगरातील दाम्पत्याकडे साडे सात लाखांची घरफोडी झाल्याची घटना 26 जुलै रोजी समोर आली होती. जिल्हापेठ पोलिसांत दाखल गुन्ह्यात 21 ऑगस्ट रोजी तांबापुरातून सोनुसिंग जगदीशसिंग बावरी यास 7 लाख 40 हजारांच्या सोन्या चांदिसह अटक करण्यात आली होती. गुन्ह्यातील त्याचा लहान भाऊ मोनुसींग जगदीश बावरी फरार होता. जिल्हापेठ पोलीस निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने मोनुसिंगच्या शनिवारी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख लाख 60 हजारांचा एैवज जप्त केला आहे. गांधीनगरात नेहते दाम्पत्यांकडे घरफोडी केल्यानंतर एैवजातून मोनुसिंग 2 लाख रुपये जुगारात हरला होता व उर्वरीत रक्कम त्याने सुरत, मुंबई येथील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती मिळाली आहे. मोनुसिंग हा अट्टल घरफोड्या असून त्यांच्याकडून शहरातील शंभरच्यावर घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याने गुन्हे शाखाही त्याच्या मागावर होती.

शहरातील तांबापुरा सिकलगरवाड्यातील सोनूसिंग बावरी याच्या घरात 21 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेसह रामानंदनगर पोलिसांनी संयुक्तिकरित्या छापा टाकला होता. यावेळी त्याच्या घरातील फ्रीजमध्ये तब्बल 7 लाख 40 हजार 598 रुपये किमतीचे घरफोडीतील दागिने मिळून आले. पोलिस कोठडीत त्याने आदर्शनगरातील घरफोडी सहित सात घरफोड्यांची कबुली दिली होती. त्याचाच लहानभाऊ मोनुसिंग बावरी फरार होता. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीस यांच्याकडून त्याचा शोध तपास सुरु होता.

मोनुसिंगच्या नातेवाईकाला घेतले ताब्यात
मोनुसींगने गांधीनगरातील प्रा.डॉ.गीता बाळकृष्ण नेहते यांचेबंद घर फोडून 7 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज त्यात दागिने आणि रोख दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. सोनूसिंग, गुरमितसिंग सुजाणसींग बावरी यांच्या अटकेनंतर स्थानिक गुन्हेशाखा तेव्हा पासूनच सोनुसिंगच्या मागावर होती. सुरेश महाजन संजय सपकाळे, दिलीप पाटील, वसंत लिंगायत विजयसिंग यांचे पथक मुंबईतील, विरार, देपुली जंगलक्षेत्रात संशयिताचा शोध घेत होते. तेथून त्यांनी मोनुसींगला आसरा देणार्‍या त्याच्या नातेवाइकाला ताब्यात घेतले होते.

जळगावात येताच आवळल्या मुसक्या
दाखल गुन्ह्यातील संशयित अट्टल घरफोड्या असून त्यांच्याकडून शहरातील शंभरच्यावर घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याने गुन्हेशाखा, जिल्हापेठ पोलिस ठाणे संशयितांच्या मागावर होते. निरीक्षक अकबर पटेल यांनी सहाय्यक निरीक्षक संदीप अराख, नाना तायडे, अजित पाटील, प्रशांत जाधव, अविनाश देवरे, हेमंत तायडे, संदीप पाटील यांच्या पथाकला सुचना केल्या होत्या. मोनुसिंग हा शहरात असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील नाना तायडे यांना पक्की खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून नेहते यांच्या घरफोडीच्या गुन्ह्यातील 5 लाख 60 हजारांचे दागिणे हस्तगत करण्यात आले असून शहरातील इतरही गुन्ह्याचा उलगडा होणार आहे.