नवी दिल्ली : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे उमेदवार व्यंकय्या नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती असतील. शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत नायडू यांना 516 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)चे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांना 244 मते पडली होती. तब्बल 272 मतांच्या फरकाने नायडू यांनी गांधी यांचा पराभव केला. या निवडणुकीत 98 टक्के मतदान झाले होते. 785 पैकी 771 खासदारांनी मतदान केले होते. विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांचे अभिनंदन केले. नायडू हे उपराष्ट्रपती म्हणून देशाची सर्वोत्तम सेवा करतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
संघाचा दुसरा स्वयंसेवक उपराष्ट्रपती
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदी राहिलेल्या व्यंकय्या नायडू यांना एनडीएच्यावतीने उमेदवारी देण्यात आली होती. तर युपीएच्यावतीने महात्मा गांधी यांचे पणतू गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली होती. एनडीएकडे बहुमत असल्याने नायडू यांचा विजय निश्चित होता. या पदासाठी शनिवारी मतदान घेण्यात आले. त्यात 98 टक्के मतदान झाले. काही खासदारांनी मतदान प्रक्रियेत चूक केल्याने तसेच गैरहजेरी लावल्याने दोन टक्के मतदान होऊ शकले नाही. राज्यसभा व लोकसभेचे खासदार या निवडणुकीत मतदार होते. नायडू यांना सर्वाधिक 516 मते मिळाली तर गांधी यांना 244 मते पडली. 272 मतांच्या फरकाने गांधी यांचा पराभव झाला. नायडू यांच्या रुपाने रा. स्व. संघाचा दुसरा स्वयंसेवक उपराष्ट्रपतिपदावर विराजमान झालेला आहे. यापूर्वी भाजपनेते भैरोसिंह शेखावत हे या पदावर विराजमान झाले होते. ते देशाचे 11 वे उपराष्ट्रपती होते.
नायडूंची थोडक्यात कारकीर्द
व्यंकय्या नायडू यांचा जन्म 1 जुलै 1949 रोजी आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात झाला होता. नेल्लोर येथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राजकारण विषयात पदवी प्राप्त केली. विशाखापट्टणम येथील विधी महाविद्यालयातून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 14 एप्रिल 1971 साली त्यांचा विवाह उषा यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा व मुलगी असे अपत्य आहेत. मुलाचे नाव हर्षवर्धन तर मुलीचे दीपा व्यंकट असे आहे. महाविद्यालयीन काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. 1972 साली झालेल्या जय आंध्रा आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. तर 1975च्या आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास घडला होता. 1977 ते 1980च्या काळात युवा आघाडीचे ते अध्यक्ष होते. वयाच्या 29 व्या वर्षी ते आमदार बनले. 1978 ते 1983च्या काळात ते विधानसभा सदस्य होते. भाजपच्या विविध पदांवरही त्यांनी काम केले. 1998मध्ये ते राज्यसभेचे खासदार झाले. 2004, 2010, आणि 2016 मध्ये ते राज्यसभेवर गेले. 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते ग्रामीण विकासमंत्री होते. 2002 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 2004 मध्ये त्यांना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले. 2014 मध्ये भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये शहरी विकासमंत्री बनले होते.
दुसरा विजय लोकशाहीचा : गांधी
पहिला विजय नायडूंचा तर दुसरा विजय लोकशाहीचा असल्याची प्रतिक्रिया उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नायडूंचे प्रतिस्पर्धी गोपालकृष्ण गांधी यांनी दिली. यासोबतच त्यांनी नायडूंच्या भावी कारकीर्दीबद्दल शुभेच्छा दिल्या. यासोबतच निवडणुकीत आपल्याला दिलेल्या समर्थनाबद्दल नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मला पाठिंबा दिलात त्याबद्दल धन्यवाद, असेही ते म्हणाले.