भुसावळ । शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गाईंच्या अंगावर विशिष्ट प्रकारचे द्रव टाकून त्यांची चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याप्रकरणी लक्ष देऊन संबंधितांचा शोध घेऊन कारवाईची मागणी गोसेवकांनी केली आहे. रात्रीच्या अंधारात गाईंची चोरी करणारी टोळी चेहर्यावर स्कार्फ बांधुन गाईंची चोरी करत आहेत. गायीच्या अंगावर विशीष्ट प्रकारचे द्रव वापरतात जेणे करुन गाय जागेवरच पडते यासंदर्भात प्रत्यक्षदर्शीने गोसेवकांना कळविले.
पशुपालकांनी काळजी घ्यावी
आनंद नगर भागातून 3 गायी चोरी झाल्या तेव्हा याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच काही दिवसांपूर्वी 6 महिन्याचे गायीचे वासरु गोसेवकांना रात्रीच्या वेळेस सापडले त्याला देखील विशीष्ट प्रकारचे पदार्थ दिला होता. त्या वासराला गुंगी येत होती, समोरील दिसत नव्हते गोसेवकांनी या वासरवर उपचार करुन सुखरुप सोडले. त्यामुळे गाई पाळणार्या नागरिकांनी आपल्या गायी दिवसा रस्त्यावर येऊ नये, तसेच त्यांच्या पोटात असे विषारी द्रव्य जाऊन त्या दगावण्याची भीती असल्यामुळे पशुपालकांनी आपल्या गाईंना गोठ्यातच बांधून ठेवण्याचे आवाहन गोसेवक रोहीत महाले यांनी केले आहे.