देहूरोड : गणेशोत्सव गाजावाजा व धांगडधिंगा करून साजरा करणारे अगदी थोडे लोक असतात. मात्र, बहुतांश लोक हा उत्सव पावित्र्य जपत आणि शांततेने साजरा करतात. याच लोकांचे भान ठेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा केल्यास तक्रारीला वाव राहणार नाही. गणेशोत्सवाचे पावित्र्य सर्वांनीच जपणे आवश्यक आहे, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गणेश मंडळांना केले. देहूरोड येथे गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सातपुते बोलत होत्या.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला देहूरोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळकर, देहूरोडचे पोलीस निरीक्षक अरूण मोरे, पौडचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, बोर्ड सदस्य गोपाल तंतरपाळे यांच्यासह देहूरोड परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माडगुळकर, धर्मपाल तंतरपाळे, बाळासाहेब झंजाड, बिट्टु लांगे, सूर्यकांत सुर्वे, लहुमामा शेलार, गोपाल तंतरपाळे आदींनी समस्या मांडल्या.
पोलीस बंदोबस्त वाढवावा
अनंत चतुदर्शीला विसर्जन मिरवणुका निघतात, तेव्हा पोलीस बंदोबस्त अतिशय कमी असतो. तो बंदोबस्त वाढविण्यात यावा, विसर्जन घाटांवर प्रकाश योजना आणि तरबेज जीवरक्षक नेमावेत, अशी मागणी बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी केली. त्याची गांभिर्याने दखल घेत, यावर्षी अशी अडचण येणार नाही, असे आश्वासन सातपुते यांनी दिले. रस्त्यावर वर्षानुवर्षे गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांनी सद्यस्थितीचा विचार करून कालानुरूप पर्यायी जागेचा मार्ग शोधला पाहिजे किंवा कमी जागेत मंडप उभारला पाहिजे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांमार्फत एक समिती नेमण्यात आली असून या समितीने अशा मंडळांची नोंद घेतल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असे यावेळी सातपुते यांनी सांगितले.
स्थानिक होमगार्ड हवेत
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश विसर्जनासाठी सात ठिकाणे आहेत. त्यामुळे मिरवणुकांच्या ठिकाणी बंदोबस्त पुरवून घाटांवर लक्ष ठेवताना कस लागतो. विसर्जनाला उशीर झाल्यास बाहेरून बंदोबस्तावर आलेले होमगार्ड थांबत नाहीत. म्हणून विसर्जनाच्या दिवशी स्थानिक होमगार्ड मदतीला मिळावेत, अशी मागणी देहूरोडचे पोलीस निरीक्षक अरूण मोरे यांनी केली.